फ्लॉप शो… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण सुरू होताच लोक मंडप सोडून निघाले

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला 75 हजारांची गर्दी होणार, असा छातीठोक दावा करणाऱया मिंधे गटाचा सपशेल फ्लॉप शो झाला. गावागावातून लोकांना बोलावणी करून आणि त्यांच्यासाठी गाडय़ांची व्यवस्था करूनही बहुसंख्य लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हजारो खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. तब्बल दीड तास उशिरा आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण सुरू करताच मंडपातील असंख्य महिला आणि पुरुषांनी बाहेरची वाट धरली. मुख्यमंत्री बोलताहेत जरा थांबा, अशा घोषणा करूनही शेकडो लोक मंडप सोडून गेले.

उपाशी लोकांची सरकारला लाखोली

कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांच्या जेवणासाठी रांगा लागल्या, पण त्यांच्या पानात पडले ते सडलेले, आंबलेले, वासाळलेले जेवण. त्याच्या वासाने खाणाऱयांचे डोके भणभणले. अनेकांना उलटय़ा झाल्या. उपाशी लोकांनी सरकारला अक्षरशः लाखोली वाहिली. घोटभर पाण्यासाठी साऱयांचीच धावाधाव सुरू होती. कुठेतरी ‘पाण्याचे व्रेट आणले आहेत असे कळताच तेथे एकाच वेळी शेकडो लोकांनी धाव घेतल्याने पाण्यासाठी अक्षरशः चेंगराचेंगरी झाली. आम्हाला घरी जेवायला मिळत नाही म्हणून इथे आणले काय? मी बचत गटाच्या 50 महिलांना सोबत घेऊन आले. त्यांना उपाशी राहावे लागले, असे सांगताना एका अंगणवाडी सेविकेच्या डोळय़ांतून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर नियोजन करता येत नसेल तर सरकारने इतक्या लोकांना वेठीला का धरले, असा सवाल रायगडवासीयांनी केला.