महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागावाटप अंतिम टप्प्यात

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद किंवा वाद नाहीत. आघाडीतील घटक पक्षांमध्ये यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असून जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून इंडिया आघाडी तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा असल्याचे यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आज सकाळीच काँग्रेसच्या उच्चस्तरीय समितीबरोबर माझी चर्चा झाली. त्या समितीमध्ये दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी जी समिती बनवली आहे त्या समितीबरोबरही आम्ही चर्चा करू. जागावाटपाबाबत चर्चा जवळजवळ झालेली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान होईल

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून वाटाघाटी सुरू आहेत. जागांवरून आमच्यात कोणतेही मतभेद नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील जागावाटपाबाबत वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत तर काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर त्याबाबत बोलणी सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान होईल, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.