निवडणूक आयोगाने पुन्हा व्हीव्हीपॅट, ईव्हीएमसंबंधीचे आक्षेप फेटाळले; विरोधकांशी चर्चा करण्यास नकार

निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा काँग्रेसने केलेले सर्व दावे नाकारले आहेत. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसने ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसंबंधी घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना एक पत्र पाठवून इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली होती. याआधीही अनेकदा आयोगाकडे ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसंदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितली असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले होते. तथापि, नव्याने स्पष्टीकरण करावे लागेल असे कुठलेही नवे मुद्दे वा वैध शंका काँग्रेसने उपस्थित केलेल्या नाहीत आणि मतदान निशाणी पत्रिकेविषयीचे नियम तर 2013 मध्ये काँग्रेसप्रणीत सरकारनेच ठरवून दिले आहेत, अशी पुस्ती आयोगाने पाठवलेल्या पत्रात जोडली आहे.

निवडणूक आयोग उद्यापासून आंध्र प्रदेश, तामीळनाडू दौऱयावर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग 7 जानेवारीपासून चार दिवस आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू दौऱयावर असणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे सात अधिकारी 7 ते 10 जानेवारीदरम्यान आंध्र प्रदेशात जाणार आहेत. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांसह निवडणूक आयुक्त गोयल हेदेखील उपस्थित राहतील.

नियम काँग्रेसच्याच राजवटीतील असल्याचा दावा

निवडणूक प्रक्रिया कायद्यातील 49 अ आणि 49 एम या व्हीव्हीपॅट यंत्रणेचे नियंत्रण आणि मतदान चिन्ह पत्रिकेची हाताळणीसाठीच्या तरतुदी काँग्रेसनेच 14 ऑगस्ट, 2013 रोजी जारी केल्या होत्या, असे आयोगाचे प्रधान सचिव प्रमोदकुमार शर्मा यांची स्वाक्षरी असलेल्या या पत्रात म्हटले आहे. ईव्हीएममधील मते आणि मतदान चिन्ह पत्रिका या शंभर टक्के जुळत असल्याची खात्री करता यायला हवी अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे. मात्र, 30 डिसेंबर, 2023 चे रमेश यांचे पत्र, ईव्हीएम/व्हीव्हीपॅटसंदर्भात कुठलाही नवा, अनुत्तरीत मुद्दा उपस्थित करत नाही, असे शर्मा यांनी म्हटले आहे.