छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाकडे होणारे दुर्लक्ष पाहून दु:ख होते, उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘श्री दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले होते. त्या प्रस्तावांवर अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने पाठवलेल्या अयोध्या विमानतळ व गोवा सरकारने पाठवलेल्या मोपा विमानतळाच्या नामकरणाचे प्रस्ताव मंजूर देखील झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील विमानतळांच्या नामकरणांची प्रक्रीया वेगाने करावी असे सांगितले आहे.

अयोध्येतील विमानतळाचे ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या विमानतळामुळे प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातील यात्रेकरूंना अयोध्येला सहज पोहोचता येईल. त्याचप्रमाणे मोपा, गोवा येथील विमानतळाला ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख आहे. महोदय, या नावांचे नामकरण स्वागतार्ह असले तरी, अत्यंत नम्रतेने आपल्या निदर्शनास आणून देणे आमचे कर्तव्य आहे की, महाराष्ट्रात मविआ सरकारने दोन विमानतळांच्या नामकरणास मान्यता दिली होती आणि केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवली होती: 1) औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण, 2) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘श्री दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण आम्ही प्रस्तावित केले होते. आम्ही हे दोन प्रस्ताव अनुक्रमे 2020 आणि 2022 मध्ये पाठवले असताना, आम्हाला विविध स्तरांवरून सांगण्यात आले की, कोणत्याही व्यक्तींच्या नावावरून नव्हे तर विमानतळ ज्या शहरांमध्ये आहेत त्या शहरांवरुन विमानतळांचे नामकरण करण्याच्या भारत सरकारच्या धोरणामुळे हा विलंब होत आहे. भारतातील 2 विमानतळांना 2 व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत, हे पाहून आम्हाला खरोखर आनंद झाला आहे आणि या 2 विमानतळांना लागू होणारे नियम आमच्या राज्यातील महाराष्ट्रातील 2 विमानतळांना देखील लागू होतात का हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो, असे उद्धव ठाकरे यांनी या पत्रातून विचारले आहे.

महाराष्ट्र राज्याला गेल्या दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आम्ही विमानतळांना ज्या 2 व्यक्तींची नावे दिली आहेत आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत, त्यांना परिचयाची गरज नाही. तरीही, लाल फितीच्या कारभारामुळे होणारा विलंब चिंतेचे कारण वाटते आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केले जात असल्याचे पाहून दुःखही होते. त्याचप्रमाणे श्री. दि. बा. पाटील यांचेही समाजासाठी मोठे योगदान आहे. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की या सुचवलेल्या 2 विमानतळांच्या नामकरणाची प्रक्रिया वेगाने करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी या पत्रातून केली आहे.