अयोध्येतील श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली होती. ही धमकी देणाऱ्या तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे भारतीय किसान मंच आणि भारतीय गौ सेवा परिषदेचे अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांनीच हा कट रचल्याचे समोर आले आहे. ही धमकी देणारा देंवेंद्र तिवारी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान हा देवेंद्र तिवारी भाजपशी संबंधित असल्याचा आरोप समावादी पार्टीने केला आहे.सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विटरवरून दोन ओळी शेअर करत ”हुकुमशहांनी एक वेगळीच रीत सुरू केली आहे, कट देखील तेच रचतात व तक्रारही तेच करतात’, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
देवेंद्रच्या सांगण्यावरून तहर सिंग आणि ओम प्रकाश यांनी दोन नवीन मोबाईल खरेदी केले होते. त्यानंतर दोघांनी देवेंद्रच्या ऑफिसच्या इंटरनेटचा वापर करून त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून योगी आदित्यनाथ, एसटीएफ प्रमुख अमिताभ यश आणि अयोध्येतील राम मंदिर बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी दिली. तसेच ‘[email protected]’ आणि ‘[email protected]’ या आयडीचा वापर करून धमकीचे ईमेलही पाठवले.
अखेर तांत्रिक तपासानंतर दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस चौकशीमध्ये आरोपींनी भारतीय किसान मंच आणि भारतीय गौ सेवा परिषदेच्या नावाने स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या देवेंद्र तिवारीच्या सांगण्यावरून हे काम केल्याची कबुली दिली. तिवारीनेच त्यांना ईमेल आयडी तयार करून धमकीचा संदेश पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. ईमेल पाठवल्यानंतर तिवारीच्या आदेशावरून आरोपींनी मोबाईल फोनही नष्ट केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.