माझा रोटी बँकेचा प्रवास…

वृषाली साठे यांचा रोटी बँकेचा प्रवास 8 मे 2021 रोजी सुरू झाला. त्यांना एक फलक दिसला. उडान या सामाजिक संस्थेमार्फत रोटी कलेक्शन आयोजित करण्यात आले होते. वृषाली यांनी उत्सुकतेपोटी दूरध्वनीवरून संपर्क साधला तेव्हा त्यांना समजले की, मुंबई रोटी बँक ही एक संस्था आहे. मुंबईचे माजी पोलीस कमिशनर शिवानंद यांनी संस्थेची स्थापना केली. चेंबूरला संस्थेचे किचन आहे. तिथे भाजी, भात, आमटी बनवली जाते, पण पोळय़ा त्यांना काही एनजीओतर्फे पुरवल्या जातात. या जमा झालेल्या पोळ्या जेवणाबरोबर टाटा, केईम, नायर येथील रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येतात. तसेच अंधशाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथेही रोटी बँकेतर्फे वाटल्या जातात.

वृषाली सांगतात, पहिल्या आठवडय़ात मी स्वतः 25 पोळय़ा दिल्या. दुसऱया आठवडय़ात माझ्या मैत्रिणीने वैशालीनेही सुरुवात केली. त्याच आठवडय़ात शेलारकाकींनी पोळय़ा करून द्यायची तयारी दर्शवली. मग काय, हळूहळू देणाऱयांचे हात वाढत गेले. चार रुपयांना एक चपाती याप्रमाणे जेवढय़ा चपात्या दान करायच्या आहेत, त्याप्रमाणे मला गुगल पे करायचे. माझ्या मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी असे कितीएक जण या कार्यात सामील होत गेले.तुमच्या विभागातही मुंबई रोटी बँकेचे कलेक्शन सेंटर असेल, तर जरूर संपर्क साधा. तुम्ही पुढाकार घेऊन तुमच्या विभागात रोटी कलेक्शन सेंटर सुरू करू शकता, असे वृषाली यांनी सांगितले.