मुंबईतील युवा खेळाडूंसाठी स्फूर्तीस्थान असलेल्या ज्युनियर मुंबई श्रीचे प्रोत्साहित करणारे आयोजन येत्या सोमवारी 8 जानेवारीला केले जाणार आहे. या स्पर्धेबरोबर मास्टर्स मुंबई श्री, दिव्यांग मुंबई श्री आणि ज्युनियर मुंबई श्री मेन्स फिजीक फिटनेस या स्पर्धांही रंगणार आहेत. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेच्या मान्यतेने होणारी स्पर्धा कांदिवली पश्चिमेला शाम सत्संग भवन, आदर्श नगर, एकता नगर क्रॉस रोडला आयोजित केली जाणार आहे.
नवोदित मुंबई श्री होताच मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंना वेध लागतात ते ज्युनियर मुंबई श्रीचे. मुंबई शरीरसौष्ठवातील भावी तारे ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेतून समोर येतात. ज्युनियर खेळाडूंसाठी शरीरसौष्ठव जगताची दारे याच स्पर्धेच्या माध्यमातून खुली होत असल्यामुळे मुंबईतील तब्बल दोनशेपेक्षा अधिक ज्युनियर्स गेले तीन महिने व्यायामशाळांमध्ये आपला घाम गाळताहेत. ही स्पर्धा २३ वर्षे वयोगटाखालील खेळाडूंसाठीच आहे. तरीही या स्पर्धेत शेकडो स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातूनच मुंबई शरीरसौष्ठवाला असंख्य नवे चेहरे लाभणार असल्यामुळे या स्पर्धेत जेतेपदासाठी कडवा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत शरीरसौष्ठवपटूंनी आधीच दिले आहेत.
सदर स्पर्धा 55, 60,65,70,75 किलोवरील अशा एकंदर सहा गटांत खेळविण्यात येणार आहे आणि स्पर्धेतील गटविजेत्यांनी अनुक्रमे 5,4,3,2 आणि1 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक रकमेची बक्षीसे असलेल्या या स्पर्धेत ज्युनियर मुंबई श्री किताब विजेत्याला 15 हजार रुपये तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेबरोबर मास्टर्स मुंबई श्री, दिव्यांग मुंबई श्री आणि ज्युनियर मुंबई मेन्स फिटनेस फिजिक या तिन्ही गटांचे प्रत्येकी दोन गट स्पर्धेत खेळतील. गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 5,4,3,2 आणि1 हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल, वजन तपासणी दुपारी १२ ते ३ या वेळेत घेण्यात येईल. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी दिली. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुनील शेगडे (९२२३३४८५६८), विशाल परब (८९२८३१३३०३) राजेंद्र गुप्ता (७९७७२ ११४२३), अब्दूल मुकादम (७९७७३ २१८८५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले आहे.