भाजप सध्या हिटलरची गोबेल्स नीती वापरतेय, शरद पवार यांची टीका

भाजपकडून 415 जागा जिंकणार असं सांगितलं जातं. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, पंजाबमध्ये भाजप नाही. गोवा, मध्य प्रदेशातील सरकार भाजपनं पाडलं. भाजपवाल्यांनी 415 म्हणो किंवा 500 म्हणो पण आज देशात भाजपला अनुकूल चित्र नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. भाजपा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे. आक्रमक प्रचारयंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली आहे. त्यातून जसं हिटलरच्या जर्मनीतील गोबेल्स नीतीची चर्चा होते, त्याचप्रमाणेत असत्यावर आधारित अनेक गोष्टी जनमानसात पसरवण्याचं काम भाजपाकडून केलं जात आहे असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे ,आमदार एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख आमदार राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘मोदी की गॅरंटी है’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केलेल्या भाषणातून लोकसभा निवडणुकांचं बिगुल फुंकलं. त्यामुळे आता देशभरात भाजपाच्या स्थानिक व राष्ट्रीय नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मोदी की गॅरंटी’ म्हणत प्रचार केला जात आहे. मात्र सध्या देशातलं चित्र भाजपला अनुकूल नाही. त्यामुळे केरळमध्ये आज कम्युनिस्ट व काँग्रेसचं राज्य आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये भाजप नाही. काही ठिकाणी भाजप आहे पण स्वत:च्या ताकदीवर नाही. गोव्यात आमदार फोडून तिथे भाजप सत्तेत आली. तीन राज्यांच्या निवडणुका होण्याआधी मध्य प्रदेशमध्ये आमदार फोडून तिथे भाजपनं सत्ता मिळवली. त्यामुळे भाजपाला देशात अनुकूल असं वातावरण नाही. अनेक कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणीच न करून लोकांची फसवणूक करण्याचं काम भाजपानं केलं आहे”, अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली.

आपल्या हातात सत्ता आल्यानंतर हे करू ते करू अशी अनेक आश्वासनं भाजपनं दिली होती. नरेंद्र मोदी संसदेत क्वचितच येतात. 2016 ते 2017 चा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी 2022-23 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु असं सांगितलं होतं. आज 2024 आहे, झालंय का दुप्पट उत्पन्न? 2022 पर्यंत शहरी भागात पक्की घरं देऊ असं सांगायचे, ते आश्वासन हवेतच गेले, असं शरद पवारांनी म्हटलं. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्र सोडलं. “मोदी संसदेत क्वचितच येतात. पण जेव्हा येतात तेव्हा एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की संसदेतले सदस्यही काही वेळासाठी थक्क होतात.

लोकसभेतील घुसखोरी प्रकरणावर भूमिका

“संसदेत काही लोक घुसले. ते घुसून काहीतरी मागणी करत होते. नंतर सभागृह बंद झालं. त्यावर आमच्या खासदारांनी पंतप्रधानांनी किंवा गृहमंत्र्यांनी संसदेला यासंदर्भात आढावा माहिती द्यावी. पण त्याला परवानगी दिली गेली नाही. विरोधी पक्षांच्या आग्रही भूमिकेचा परिणाम 146 खासदारांच्या निलंबनात दिसून आला”, असंही शरद पवारांनी सांगितलं.