>> प्रसाद नायगावकर.
मिंधे गटाच्या नेत्या आणि यवतमाळ-वाशीम मतदार संघाच्या लोकसभा खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. भारतीय आयकर कायद्याच्या कलम 131 (1A) कलमानुसार खासदार गवळी यांच्याकडून आयकर विभागाने काही हिशोब मागवले आहेत. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्याबाबतची ही नोटीस आहे. या नोटीसीला त्यांना 5 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
याआधी भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस बजावली होती. 2022 मध्ये हे प्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र आता आयकर विभागाची नोटीस मिळाल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणूक लढाविण्यासाठी भावना गवळी या कामाला लागल्या आहेत. पण मिंधे गट आणि भाजप हे भावना गवळी यांना उमेदवारी देण्यास फारसे अनुकूल नाही असं काहीस चित्र आहे .याच कारणाने दबावतंत्र म्हणून त्यांना आयकर विभागाची नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क साधला असतांना यां नोटीसचे आपण उत्तर देणार असल्याचे सांगितले.