इतिहास, कला आणि संस्कृतीचा मेळा!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुंबईतील कलाप्रेमींना साद घालणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल’ येत्या 11 ते 14 जानेवारी या कालावधीत होणार आहे. सृजनशील कलाकृतींसोबत लहान मुलांना प्रोत्साहन देणारी शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या महोत्सवात असणार आहे.

वेध फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवात 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता दादरच्या वनिता समाज हॉलमध्ये ‘निर्मिती बिझनेस कनेक्ट’मध्ये उद्योजक चेतन रायकर (एमडी, स्ट्रक्टवेल) आणि कौस्तुभ रायकर (एक्झिक्युटीव्ह डिरेक्टर, स्ट्रक्टवेल) हे सहभागी होणार असून त्यांची मुलाखत वैष्णवी कानविंदे घेणार आहेत. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील पालिका क्रीडा भवनात आंतरमहाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धा होतील. 12 जानेवारी रोजी ‘दादुस ’ अर्थात संतोष चौधरी याच्या गाण्यांचा कार्यक्रम होईल. 13 जानेवारीला कोकण कलेक्टिव बॅण्डच्या गायिकांचे तर 14 जानेवारीला थ्री मॉक्स बॅण्डचे सादरीकरण होईल. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता पालिका क्रीडा भवनात होणार आहेत. महोत्सवात मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वेध फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांनी केले आहे.

निष्ठावान वीर मराठा योद्धय़ांची चित्रमय यशोगाथा

1.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि प्रेरणेतून निर्माण झालेली, छत्रपती राजाराम महाराज ते यशवंतराव होळकरांपर्यंत असणाऱया महाराष्ट्राच्या निष्ठावान वीर मराठा योद्धय़ांची चित्रमय यशोगाथा तसेच दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्थळामागील जागा, गेट क्र. 6, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हे प्रदर्शन पाहता येईल.

2.छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील पार्क क्लब शेजारी सायंकाळी 4 ते 10 या कालावधीत बच्चे कंपनीसाठी खास किड्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वनिता समाज हॉल येथे सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत विविध कलाकृतींचे प्रदर्शन आणि कार्यशाळा होणार आहेत. याशिवाय स्पॉट फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे.

3.14 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता वनिता समाज हॉल येथे सेलिब्रेटी स्टॅण्डअप कॉमेडी शो पार पडणार आहे. महेश मांजरेकर, क्रांती रेडकर, पार्थ भालेराव, विजू माने, आशय कुलकर्णी, कोकण हार्टेड गल, अनिश गोरेगावकर, योगेश शिंदे, निनाद गोरे, श्रुतिक कोळंबेकर, सिद्धांत सरफरे, आर.जे. प्रणीत यात सहभागी होणार आहेत.