वेषांतर करून केली घरफोडी

आर्थिक गुन्हे शाखेने सील केलेल्या सदनिकेत वेषांतर करून घरफोडी करणाऱया दोघांना अखेर ओशिवरा पोलिसांनी अटक केली. प्रदीप कुकरेजा आणि मारूप मोटवानी अशी त्या दोघांची नावे आहेत. चोरी केल्यावर ते गोव्याला मौजमजा करण्यासाठी गेले होते.

तक्रारदार हे मुलुंड येथे राहतात. त्याच्या बहिणीचा अंधेरी येथे फ्लॅट आहे. तक्रारदार याच्या बहिणीविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून त्याची बहीण ही फरार आहे. सप्टेंबर महिन्यात त्याच्या बहिणीच्या घराला आर्थिक गुन्हे शाखेने सील केले होते. त्या घरात काही पुस्तक असल्याने तक्रारदार याने पोलिसांची परवानगी घेऊन तेथून काही पुस्तके आणली होती. 29 डिसेंबरला तक्रारदार याच्या भाच्याने व्हिडीओ पाहिला. सील केलेल्या घरात दोन जण घुसल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत होते. चोरटय़ाने तिजोरीतून काही पैसे आणि सोने चोरून नेले होते. घरफोडीप्रकरणी त्याने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय माडये, सहायक निरीक्षक आनंद नागराळ, मुजावर, सुतार, माने, बोबडे, गीते यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये दोन जण वेषांतर करून विनाचपल घरात शिरल्याचे दिसले. पोलिसांनी त्या इमारतीमधील सीसीटीव्हीची तपासणी केली. फुटेजच्या तपासणीनंतर पोलीस मोटवानीच्या घरात चौकशीसाठी गेले. तेथे गेल्यावर पोलिसांना काही वस्तू दिसल्या. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसानी पकडू नये म्हणून मोटवानीने त्याचा नंबर बंद करून ठेवला होता. तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी फिल्डिंग लावून मोटवानीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत कुकरेजाची माहिती मिळाली. तो उल्हासनगर येथे असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. तेथे काही तास पोलिसांनी फिल्डिंग लावून कुकरेजाला ताब्यात घेतले.