बुधवारी पहाटे गोवंडी गावात एक थरारक घटना घडली. चोरी करायला घरात घुसलेल्या चोराने पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. हे वृत्त पसरताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर शताब्दी इस्पितळात उपचार सुरू आहेत. गोवंडी पोलिसांनी आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहेत.
ऐश्वर्या असे चोराच्या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्या पती आणि मुलांसह गोवंडी गावात राहतात. बुधवारी तुपे कुटुंबीय गाढ झोपेत असताना पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या घरात एक चोरटा घुसला. घरात काहीतरी गडबड होत असल्याचे जाणवताच तुपे कुटुंबीय जागे झाले. तेव्हा घरात चोर घुसल्याचे लक्षात येताच तुपे कुटुंबियांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चोराने आपण पकडले जाऊ नये यासाठी ऐश्वर्या यांना हाताने मारहाण करून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर त्याने राहुल यांनाही मारहाण करत सोबत आणलेल्या ब्लेडने त्यांच्या हनुवटीवर वार केला. तुपे यांच्या घरातून मोठय़ा प्रमाणात आवाज येऊ लागल्याने शेजारी खडबडून जागे झाले व त्यांनी तुपेंच्या घराकडे धाव घेतली. चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण शेजाऱयांनी त्याला पकडले. मग पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अरविंद देशमुख (30) या चोराला अटक केली. अरविंद हा सराईत आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.