मी विखेंसमोर लोकसभा लढवणार – राणी लंके

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या मुद्दय़ावरून भाजप आणि मित्रपक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे. आज जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी आज मोहटादेवी गडावरून ‘शिवस्वराज्य यात्रे’ला सुरुवात केली असून, आगामी काळात होणारी लोकसभा निवडणूक मी किंवा आपले पती आमदार नीलेश लंके हे लढवणार असल्याचे सांगत रणशिंग फुंकले आहे.

आमदार लंके यांच्या या पवित्र्यामुळे भाजप व मित्रपक्षांत धुसफूस सुरू झाली असल्याचे मानले जात आहे. आज राणी लंके यांनी मोहटा देवीचे दर्शन घेत ‘शिवस्वराज्य यात्रे’ला प्रारंभ केला. त्यानंतर पाथर्डीतील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीचाच एक भाग म्हणून आजपासून नगर दक्षिणमध्ये ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू करण्यात आली असल्याचे राणी लंके यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक असून, समोर कोण उमेदवार आहे, याचा विचार न करता लढणार आहे. या निवडणुकीत मला किंवा आमदार लंके यांना उमेदवारी निश्चित मिळू शकते, असेही त्या म्हणाल्या. ‘शिवस्वराज्य यात्रे’त लंके प्रतिष्ठानच्या दहा गाडय़ा सहभागी होणार असून, त्यामध्ये पाच शिवव्याख्याते असणार आहेत. नगर दक्षिणमधील प्रत्येक तालुक्यात जाऊन चौकाचौकात शिवरायांचे महत्त्व जनतेला पटवून देणार आहोत.