माळीवाडा एसटी स्टँडवरील रिझर्वेशनची सुविधा बंद, शिवसेना आक्रमक

माळीवाडा स्टँडवरील रिझर्वेशनची सुविधा अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे ते केंद्र पूर्ववत सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज देण्यात आला. याबाबतचे निवेदन नगरचे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांना देण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, राम नळकांडे, अशोक दहिफळे, प्रशांत गायकवाड, संतोष गेनप्पा, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, सुरेश शिरसागर, सचिन गोरे, संदीप दातरंगे, अक्षय रोकडे, डॉ. श्रीकांत चेमटे आदींसह शिवसैनिक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता.

निवेदनात म्हटले, माळीवाडा बसस्थानकावर आजपर्यंत प्रवाशांना ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी जी सोय होती, ती अचानक बंद केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी माळीवाडा बसस्थानकावर जाऊन पाहणी केली असता, रिझर्वेशनची सुविधा कारण नसताना बंद करण्यात आलेली आहे. वास्तविक नगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माळीवाडा बसस्थानकावर ही सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. तो नगरच्या नागरिकांचा हक्क आहे. एस.टी.ची सुरुवात ज्या स्टँडवरून झाली, त्या बसस्थानकावर असलेली सुविधा काहीही कारण नसताना व अचानक बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. तरी वरील सुविधा त्वरित पूर्ववत विनाविलंब सुरू करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.