तालुक्यातून जाणाऱया तीन राष्ट्रीय महामार्गांवर तसेच अंतर्गत जोडणाऱया रस्त्यांवर मावळत्या वर्षात अपघातांची मालिका सुरूच राहिली असून, 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2023 या वर्षभरात 76 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे, तर 83 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातून प्रवास करताना वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळून आपली वाहने सावकाश चालविण्याची गरज निर्माण झाली आहे.
गाव ते वेगवेगळी राज्ये जोडणाऱया रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. त्याचबरोबर अपघाताचे संकट ओढावून घेणाऱयांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मोहोळ तालुक्यातून सोलापूर-पुणे, मोहोळ -मंद्रूप व नव्याने झालेला मोहोळ- पंढरपूर -आळंदी पालखीमार्ग असे एकूण तीन मार्ग जातात. सोलापूर जिह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोहोळ तालुक्यात मोठय़ा प्रमाणातून परराज्यातील वाहनांची वाहतूक होत असते.
2023 मध्ये तीन राष्ट्रीय महामार्गांबरोबरच मोहोळ शहराला तसेच राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱया अंतर्गत रस्त्यांवरती जवळपास 71 अपघात झाले असून, त्यामध्ये 76 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 83 जण जखमी झाले आहेत. वर्षभरामध्ये घडलेल्या या अपघाताच्या घटनांमध्ये सर्वात जास्त मृत्यूची संख्या ही रात्री व पहाटे झालेल्या अपघातांमध्ये आहे. त्यामुळे वाहनचालकांनी रस्ते वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षितपणे प्रवास करणे गरजेचे आहे.
एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर 108 क्रमांकावर किंवा पोलिसांना संपर्क करून अपघाताची माहिती देऊन जखमींना मदत करण्याचे धाडस अजूनही अनेक नागरिक किंवा दुसरे वाहनचालक करत नाहीत. अपघातातील जखमींना वेळेवर मदत मिळाली तर त्यांचा जीव नक्कीच वाचू शकतो. याबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक असणे गरजेचे आहे. अनेक वेळा महामार्गावरील नादुरुस्त वाहनांमुळे, मुदतबाह्य गाडय़ा रस्त्यावर वापरल्याने गंभीर अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्याच्या हद्दीत सर्व्हिस रस्ता नाही, त्यामुळे तालुक्यातील महामार्गालगतच्या गावातील दुचाकीस्वारांना मुख्य रस्त्यावरून वाहतूक करावी लागते. त्या दरम्यान रस्ता ओलांडून पलीकडे जावे लागते. कोटय़वधींचा टोल वसूल करणाऱया कंपनीला तसेच सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सर्व्हिस रस्त्याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळे मोहोळ तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱया वाहनचालकांनी सावध होऊन सुरक्षितपणे प्रवास करणे गरजेचे आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ब्लॅक स्पॉट संदर्भात कागदोपत्री उपाययोजनांऐवजी ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत.
चांगले रस्ते व वाढलेली वेगाची मर्यादा हे अपघातांचे सगळ्यात मोठे कारण ठरत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेगाच्या मर्यादेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्वतःची, कुटुंबाची काळजी ठेवून सुरक्षित प्रवास करणे आता महत्त्वाचे आहे.
– सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक, मोहोळ.
सुरक्षित प्रवासासाठी तिन्ही महामार्गांवर पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातांचे ठिकाण म्हणून जनजागृतीचे बोर्ड लावणे गरजेचे आहे. तसेच रस्ते दुभाजक ठेवलेल्या ठिकाणी मोठी प्रकाशयोजना करणे आवश्यक आहे. तसेच महामार्ग पोलीस प्रशासनाकडून कागदोपत्री मार्गदर्शन शिबिर ठेवण्यापेक्षा प्रत्यक्षात कार्यवाही होणे गरजेचे आहे.
– संजय क्षीरसागर, लोकसेवक, मोहोळ.