दहावी-बारावीच्या केंद्राची सेंटर बदल करण्यास, मुख्याध्यापक शिक्षक पालक संघटनेचा विरोध अन्यथा तिव्र अंदोलन करणार – प्राचार्य सुनिल पंडित

प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा अधिक परीक्षा केंद्र आहेत तेथील विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्याचा निर्णय आपल्या विचाराधीन आहे, तो तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन विभागीय सचिव, पुणे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे की, प्रवेश घेतानाच विद्यार्थी सोयीच्या शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेत असतो. शिक्षण घेत असताना तो परिसर त्याच्या परिचयाचा झालेला असतो. परंतु ऐनवेळी परीक्षा केंद्रात बदल झाल्यास त्याला गैरसोयीचे केंद्र व अपरिचित ठिकाणी परिक्षेला जावे लागल्याच्या कल्पनेने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम त्याच्या परीक्षेवर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. लांबचे केंद्र असल्याने सर्वच पालकांना आपल्या पाल्यास परीक्षा केंद्रावर सोडणे शक्य होणार नाही. परीक्षा कालावधीत अनेक वेळा लग्नसराई किंवा अन्य तत्सम गर्दी निर्माण होणार्‍या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती आहे.

तसेच काही कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर हा मोठा असतो, तेथे एकापेक्षा जास्त इमारतीत बैठक व्यवस्था केलेली असते. विषयाची विविधता असल्याने इयत्ता बारावीची बैठक व्यवस्था प्रत्येक पेपरला बदलली जाते त्यामुळे परीक्षा हॉल शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावी महत्वाचे वर्ष असतात. त्यामुळे याबाबत कुठलाही निर्णय घेताना तो राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असावा परंतु या निर्णयामुळे ठराविक विद्यार्थ्यांचेच केंद्र बदलणार असल्याने यामध्ये भेदभाव निर्माण होऊन समानता राहत नाही. त्यामुळे सर्व बाबींचा विचार केल्यास परीक्षा केंद्राची सरमिसळ करणे अव्यवहार्य आहे. तरी तो निर्णय रद्द करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, सरचिटणीस बाळासाहेब कळसकर, शहर कार्याध्यक्ष देवडे रवींद्र, प्रा.सोपानराव कदम, प्रा.दीपक जाधव, प्रा. सतीश शिर्के, राजेंद्र जाधव, बाळासाहेब कळसकर व पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती शिक्षणमंत्री, अध्यक्ष व सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना पाठविण्यात आल्या आहेत.