दिल्लीच्या ताटाखालचं मांजरं म्हणत संजय राऊतांची राज्य सरकारवर जबरदस्त टीका; महानंदासंदर्भात दिला इशारा

राज्यातून एका पाठोपाठ एक उद्योग गुजरातमध्ये नेले जात असताना आता महानंद देखील गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. यासंदर्भात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. राज्यातील सत्ताधारी दिल्लीच्या ताटाखालचं मांजरं बनून हे सगळं सहन करत आहेत असा हल्ला करतानाच महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात दुधाचे अनेक ब्रँड्स आहेत. महानंद, गोकूळ, वारणा, चितळे असे अनेक ब्रँड्स आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दूध उत्पादन किंवा डेअरी यांचं खूप मोठं जाळं आहे. त्यासाठी अमूलच पाहिजे असं नाही’. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत चर्चेत राहिलेल्या नंदीनी ब्रँडचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. कर्नाटकात नंदीनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदीनी ब्रँड वर कर्नाटकची निवडणूक लढवली गेल्याचं ते यावेळी म्हणाले.

‘महाराष्ट्रातील महानंद देखील गुजरातला नेण्याचा प्रयत्न आहे असं वृत्त वाचायला मिळत आहे. महानंद ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती ओळख देखील पुसून टाकली जात आहे. त्यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही की अशा प्रकारे राज्यातील एक एक उद्योग, व्यवसाय रोज ओरबडून गुजरातला नेले जात आहेत. हे तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. हे कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? हे काय महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत जे आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहताहेत? ओरबडताना पाहात आहेत. या महाराष्ट्रात शेवटी तुम्ही आम्हाला काय ठेवणार आहात? या राज्यातली दुग्ध व्यवसायातील सहकारी चळवळ गुजरातला नेत आहेत आणि एकजात सगळे दिल्लीच्या ताटाखालचे मांजरं बनून हे सगळं सहन करत आहेत. महाराष्ट्रात हे धृतराष्ट्राचं सरकार निर्माण झालं आहे, जे महाराष्ट्राचे अपमान, महाराष्ट्राची लूट उघड्या डोळ्यानं बघत आहे. महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.