HBD Michael Schumacher – फॉर्म्युला वनचा बादशहा शूमाकर सध्या काय करतो?

आज फॉर्म्युला वनचा सरताज म्हणवल्या जाणाऱ्या मायकल शूमाकरचा 54वा वाढदिवस. एकेकाळी जगभरातील फॉर्म्युला वन कार रेसिंगचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शूमाकर आज अनेकांसाठी विस्मृतीत गेला आहे. कारण, गेल्या 10 वर्षांपासून तो अतिशय दुर्धर अवस्थेत जीवन-मरणाशी झुंजत आहे.

कोण आहे मायकल शूमाकर

फॉर्म्युला वन या खेळाचा चाहता असलेल्या कुणालाही मायकल शूमाकर हे नाव माहीत नाही, हे अशक्यच. मूळचा जर्मनीचा नागरिक असलेल्या शूमाकरने बेनेटन या फॉर्म्युला वन रेसिंग कारमधून जगज्जेतेपद पटकावलं. त्यानंतर शूमाकरने फरारी या संघाकडे कूच केली आणि फॉर्म्युला वनमधील अनेक विक्रम त्याने आपल्या नावे केले. फॉर्म्युला वन शूमाकर आणि फरारी हे त्रिकोणी समीकरण तेव्हापासून एफवन चाहत्यांसाठी पर्वणी ठरू लागलं. 2000 ते 2004 या सलग पाच वर्षांत फरारीसाठी एफवन चॅम्पियनशिप जिंकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. सात वेळा जग्गजेता, 91 शर्यतींचा विजेता, 68 पोल पोझिशन असे अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत.

2006 मध्ये निवृत्ती स्वीकारल्यानंतर 2010मध्ये शूमाकरने मर्सिडिझ या कारसाठी एफवनमध्ये पुनरागमन केलं. 2012साली स्पेनमधील ग्रां.प्री.मधील तिसरे स्थान वगळता त्याला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. म्हणून त्याने एफवनमधून दुसऱ्यांदा निवृत्ती स्वीकारली. या खेळामुळे त्याला जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. देखण्या चेहऱ्यामुळे तो तरुणींमध्येही भलताच लोकप्रिय झाला.

मात्र, 29 डिसेंबर 2013 रोजी आईस स्कीईंग खेळताना झालेल्या अपघातात शूमाकर कोमात गेला. तेव्हापासून आजतागायत शूमाकर त्याच्या चाहत्यांना दिसलेला नाही. वेळोवेळी त्याची पत्नी आणि कुटुंबीयांकडून त्याच्या प्रकृतीची माहिती समोर आणली जाते. मात्र, अद्यापही तो त्याच स्थितीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्याच्यावर त्याच्या राहत्या घरात 15 वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या विस्मृतीत गेला असला तरी त्याने पुन्हा उठून उभं राहावं, अशी प्रार्थना जगभरातील त्याचे चाहते करत आहेत.

शूमाकर याचा मुलगा मिक शूमाकर यानेही फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण केले असून सध्या तो मर्सिडिझ एफवन संघाचा राखीव चालक आहे.