कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्यावर भावाने भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या डॅमियन डीसाचा आज सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर पळून गेलेल्या ड्रसन डीसाचा पोलीस शोध घेत आहेत.
चित्रा डीसा ही ड्रसन ची पत्नी होती. तर डॅमियन त्याचा मोठा भाऊ होता. ते मालाडच्या एव्हरशाईन नगर मध्ये राहत होते. गेल्या आठवडय़ात ड्रसन च्या घरी मोलकरीण आली. तिने दरवाजाची बेल वाजवली. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मोलकरणीला घराबाहेर रक्ताचे डाग दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने याची माहिती बांगूरनगर पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. तेव्हा चित्रा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर डॅमियन देखील जखमी अवस्थेत पडून होता. पोलिसांनी डॅमियनला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. गेल्या चार दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. आज सायंकाळी डॅमियन चा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी ड्रसन विरोधात गुन्हा नोंद केला. ड्रसनच्या अटकेसाठी पोलिसांनी पाच पथक तयार केली आहे. पोलिसांचे एक पथक गोवा येथे देखील गेल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र ड्रसन अजून पोलिसांच्या हाती लागला नाही. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक देखील करत आहेत. हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.