अंबिका मसाला जगभर पोहचवणाऱया कमल परदेशी यांचे निधन

छोटय़ाशा खेडेगावातून उद्योगाला सुरुवात करून जगभर ‘अंबिका मसाला’ ब्रँड पोहोचविणाऱया उद्योजिका कमल परदेशी (63) यांचे मंगळवारी ससून रुग्णालयात निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये कमल परदेशी यांनी बचत गटातील महिलांना एकत्रित करून अंबिका मसाला हा ब्रँड तयार केला. अल्पावधीतच त्यांचा ब्रँड जगभर पोहोचला. छोटय़ाशा खेडेगावातून मसाला कंपनी सुरू करून शेकडो महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. शेतमजूर ते कोटय़वधींची उलाढाल करणाऱया अंबिका मसाल्याच्या अध्यक्ष हा त्यांचा प्रवास अक्षरशः डोळे दिपवणारा ठरला.

कमल परदेशी यांनी 2000 साली खुरपणीच्या मिळणाऱया पैशांतून बचत करत ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. आज अंबिका मसाल्यांना देशभरातच नाही, तर परदेशातही मोठी मागणी आहे. त्यांचे मसाले पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत.

परदेशी यांना उद्योग उभारताना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. पण त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या उद्योगासाठी कोरोना काळ प्रचंड त्रासदायक ठरला. पण तरीही त्यांनी नेटाने आपले काम सुरूच ठेवले. अनेक गोरगरीब महिलांना त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून रोजीरोटी दिली. आपल्या व्यवसायातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे त्यांचे ध्येय शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होते.