फोडाफोडीच्या राजकारणात माहिर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील आयारामांना पायघडय़ा घालण्यास सुरुवात केली आहे. दुसऱया पक्षातील नाराजांना हेरून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. दुसऱया पक्षातील फुटीरांना प्रवेश देण्यासाठी आठ सदस्यांची समितीच स्थापन करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण करून विरोधी पक्षातील नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून देशपातळीवर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसऱया पक्षातून येणाऱया राजकीय नेत्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.
चार केंद्रीय मंत्री, एक मुख्यमंत्री समितीत
दुसऱया पक्षातून फुटून भाजपमध्ये येणाऱया नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यासाठी आठ जणांची समिती स्थापन केली आहे. यामध्ये भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव आणि मनसुख मांडविया या चार केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. तर तीन राष्ट्रीय महासचिव म्हणजेच विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बन्सल मुख्यमंत्री हेमंत सर्मा या समितीत असतील. प्रत्येक राज्यात अशीच समिती स्थापन करण्यात येणार आहे.