मनोरंजन महागणार; नाटयगृहे, चित्रपटगृहे, सर्कसवर करवाढीचा प्रस्ताव

दिवसभर कामात पिचलेल्या जीवाचे दोन घटका मनोरंजन व्हावे, यासाठी नाटक, चित्रपटांकडे वळणाऱया मुंबईकरासाठी आता हे मनोरंजनही महाग होणार आहे. मुंबई महापालिकेने 2024-25 साठी नाटय़गृहे, चित्रपटगृहे आणि सर्कसच्या करात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो पालिका प्रशासकांकडे मंजुरीसाठी पाठण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नाटके आणि चित्रपटांच्या तिकिटांच्या दरात वाढ होणार आहे. मात्र, त्यातून महापालिकेला वर्षाला सुमारे 10 कोटींचा महसूल मिळणार आहे.

2011 नंतर मुंबई महापालिकेने नाटय़गृहे, चित्रपटगृहे आणि सर्कसच्या करात वाढ केलेली नाही. त्यात पूर्वीचे सिंगल स्क्रिनिंग चित्रपटगृहे आता जवळजवळ नामशेष झाली आहेत. मल्टिप्लेक्समध्ये एकाच वेळी चार ते पाच चित्रपट दाखवले जातात. चित्रपटांच्या लोकप्रियतेनुसार त्यांचे दरही वेगवेगळे असतात. मल्टिप्लेक्सचे मालक 200 रुपयांपासून ते 1550 रुपयांपर्यंत ते तिकिटांच्या किमती आकारतात. त्या पार्श्वभूमीवर, 13 वर्षांनंतर करवाढ केली जाणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

अशी होणार करवाढ
वातानुकूलित नाटय़गृहे आणि चित्रपटगृहांसाठी अंदाजे 200 रुपये करवाढीची शक्यता आहे तर बिगर वातानुकूलित नाटय़गृहे आणि चित्रपटगृहांसाठी 45 रुपयांपासून ते 90 रुपयांपर्यंत करवाढ केली जाऊ शकते.