देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत सोमवारी 6 रुग्ण सापडले असताना आज त्यात वाढ झाली असून दिवसभरात 26 रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 137 वर पोहोचली आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 731
राज्यात आज 105 कोरोना रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या 731 वर पोहोचली आहे. यापैकी 695 जण होम कोरंटाईन असून 36 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी आयसीयूमध्ये 29 तर जनरल वॉर्डमध्ये 7 जणांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सात दिवसांत दुपटीने वाढली असताना मुंबईतही आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत आज सापडलेल्या 26 कोरोना रुग्णांपैकी 3 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 19 जण आज कोरोनामुक्त झाले असून 441 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आज सापडलेल्या 51 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आढळली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.