भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीजनिर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला असून, त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
आश्वी बु. येथे रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड यांचा अभीष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार प्राजक्त तनपुरे, सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रकाश गजभिये, ज्येष्ठ नेते रावसाहेब मस्के, दुर्गा तांबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायम कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. हाडाचे कार्यकर्ते शोधून त्यांना संधी दिली. तर, बाळासाहेब गायकवाड यांनी कायम पुरोगामी विचार जपला.’
प्राजक्त तनपुरे म्हणाले, ‘शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारलाच बहुमत मिळणार. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’
शरद पवार यांनी अनेकांना मोठमोठी पदे दिली. मात्र, ते पळून गेले. तरीही 83 वर्षांचा योद्धा लढतो आहे आणि तुम्ही ईडीला घाबरून पळत आहात, अशी टीका बाळासाहेब गायकवाड यांनी केली. आपण कायम पुरोगामी विचार जपला असून, यापुढील काळात ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. तसेच देहदान करणार असल्याची घोषणा करीत ते पत्र शरद पवार यांच्या हस्ते डॉ. तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाला नवनाथ आंधळे, बबनराव शिंदे, संतोष ताजणे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. विजय हिंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. राहुल जऱहाड यांनी आभार मानले.