काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षाने आज हिंसक वळण घेतले. विरोधकांचा ऊस जाणीवपूर्वक घेण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते संदीप नेजदार यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली. गाडीतून ओढून कपडे फाटेपर्यंत ही मारहाण करण्यात आल्याने, कसबा बावडा परिसरात वातावरण तंग झाले होते.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा संघर्ष पाहायला मिळाला. माजी आमदार अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा कारखान्यावर सत्ता मिळवली. पण गेल्या काही दिवसापासून गळीत हंगामात विरोधकांचा ऊस घेण्यास सत्ताधारी टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत आज दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला होता.
दरम्यान आज सायंकाळी याचे पडसाद उमटले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस हे काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्ली समोर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. विरोधक म्हणून आपला ऊस घेत नसल्याचा जाब विचारत सतेज पाटील गटाचे माजी स्थायी सभापती व नगरसेवक संदीप नेजदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिटणीस यांना गाडीतून ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली.
जमिनीवर पाडून कपडे फाटेपर्यंत बेदम चोप देण्यात आला. गाडीवर लाथा मारुन,गाडीचा दरवाजा तोडण्यात आला.सुमारे दहा मिनिटे सुरू असलेल्या या मारहाणीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. काहींनी मध्यस्थी करून चिटणीस यांना पुन्हा गाडीत बसवुन,परिसरात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण सायंकाळी महाडिक गटाचे कार्यकर्तेही जमू लागल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला होता.