नगर – टँकर, ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम, काही पंपावर पेट्रोल संपले; शिल्लक ठिकाणी वाहनांच्या रांगा

केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वाहन कायद्याविरोधात टँकर व ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा सर्वच जनमानसावर परिणाम झालेला पाहावयास मिळत आहे. पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होणार नसल्याने नगर शहरात काल (सोमवार) सायंकाळपासून पेट्रोलपंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी केली. तर आज काही पेट्रोल पंपांनी पेट्रोल संपल्याचे फलक लावले.

हिट अॅण्ड रन प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात टँकर व ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रक चालक – मालक संघटनेने संप पुकारला आहे. यामुळे सर्वच वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. परिणामी इंधन खरेदी करण्यासाठी नागरिकांची पेट्रोल पंपांवर गर्दी झाली आहे. देशभरासह राज्यात पेट्रोल विक्री बेमुदत बंद राहणार, अशा अफवा काल सुरू झाल्या. त्यामुळे वाहनचालकांनी पेट्रोल पंपाच्या दिशेने धाव घेतली. खिशात असेल तितक्या पैशांचे इंधन भरायचे, असा संकल्पच अनेकांनी केला होता. त्यामुळे नगर शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, आज सकाळी नगर शहरातील काही पेट्रोलपंपावर पेट्रोल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आले तर पेट्रोल शिल्लक असलेल्या पंपांवर वाहनचालकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती पसरल्याने वाहनधारकांकडून पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. वाहनचालकांनी अचानक मोठ्या प्रमाणात इंधन भरल्याने शहरातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले होते.

भाजीपाल्यांची आवक घटली; गॅस पुरवठा ठप्प
वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झालेला पहायला मिळत आहे. दरम्यान, आज नगरच्या बाजारात भाजीपाल्यांची आवक घटल्याचे दिसून आले. तसेच आज बहुतांश ठिकाणी गॅस टाक्यांचा पुरवठा झाला नाही. गॅस टाक्यांचा पुरवठा ठप्प झाल्याचे दिसून आले आहे. भाजीपाल्यांची आवक आणखी घटली तर भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
पेट्रोल व डिझेल अभावी अनेक खासगी वाहने आज उभी असल्याचे चित्र आहे. परिणामी, प्रवाशांनी प्रवासासाठी एसटी बसचा आधार घेतला. त्यामुळे प्रवाशांची आज नगरच्या तीनही बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती.