‘ही’ तर बलात्कारी जनता पार्टी, काँग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या वाराणसीतील भाजप आयटी सेलच्या तीन पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींपैकी एक तर भाजपच्या तिकीटावर नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता. त्यावरून सध्या भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नेता डिसूझा यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप ही भारतीय जनता पार्टी नसून बलात्कारी जनता पार्टी झाली आहे, अशी सडकून टीका नेता डिसूझा यांनी केली आहे.

“भाजपा बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत असते. पण आता भाजपा भारतीय जनता पार्टी नसून बलात्कारी जनता पार्टी झाली आहे. पंतप्रधानांच्याच मतदारसंघात एका युवतीवर सामुहिक बलात्कार होतो आणि आरोपी भाजपाच्या आयटी सेलचे सदस्य निघतात. हे बलात्कारी मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाचा प्रचार करत असल्यामुळेच त्यांना अटक करण्यासाठी घटनेनंतर 60 दिवस लागले’, अशी टीका नेता डिसूझा यांनी केली आहे.

कुणाल पांडे, आनंद ऊर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल हे तीन नराधम भाजप आयटी सेलचे पदाधिकारी आहेत. मोदी, नड्डा आणि स्मृती इराणींसोबत या नराधमांचे काही फोटो काँग्रेसने शेअर केले आहेत.

कोण आहेत हे आरोपी?

कुणाल पांडे या आरोपीचे दोन वर्षांपुर्वी लग्न झाले असून त्याचे सासरे नगरसेवक आहेत. त्यामुळे तो सुद्धा नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत होता. तसेच, घटनेच्या दिवशी वापरलेली बुलेट कुणाल पांडेची असल्याचे तपासात उघडं झाले आहे.

दुसरा आरोपी सक्षम पटेल हा कौरिया हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर आहे. त्याच्या कुटुंबीयांचा फळांचा व्यावसाय आहे. त्याच्या घरी आमदारांपासून ते सत्ताधारी पक्षातील लोकांची ये-जा सुरू असल्याचे बोलले जात आहे. तो सुद्धा कही दिवसांपासून एका बड्या स्थानिक नेत्याच्या संपर्कात होता.

तिसरा आरोपी आनंद ऊर्फ अभिषेक चौहान याच्यावर यापुर्वी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचे वडील साडी प्रिंटिंगचे काम करतात आणि अभिषेक हा 12वी चे शिक्षण घेत आहे.