ड्रग्ज, बेकायदेशीर दारूची तस्करी होऊ नये याकरिता पोलिसांनी थर्टी फर्स्ट नाईटला ठिकठिकाणी विशेष पाळत ठेवली होती. शिवडी येथे गांजाची तस्करी करणाऱया तरुणाची नाकाबंदी बघून टरकली. तो मागे फिरून सटकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील स्कुटीच्या डिकीत छोटय़ा पुडय़ांमध्ये ठेवलेला तब्बल 690 ग्रॅम गांजा सापडला.
रे रोड रेल्वे स्थानकाबाहेरील ए शेड येथे शिवडी पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. रात्री उशिरा एक तरुण स्कुटीवरून त्या ठिकाणी आला. पण नाकाबंदी बघून त्याची टरकली आणि तो मागे फिरण्याच्या बेतात होता. पण त्या ठिकाणी तैनात असलेले प्रभारी निरीक्षक विशाल चंदनशिवे, सपोनि पिंगळे, उपनिरीक्षक साकोरे, धुमाळ व घोंगरे यांनी त्या 19 वर्षीय तरुणाला थांबविले. त्याच्याकडे वाहन परवाना आदी सगळे होते. पण त्याच्या गाडीची डिकी उघडताच तो गडबडला. डिकीत असलेल्या पिशवीत काय आहे, असे पोलिसांनी विचारताच त्याची बोबडीच वळली. मग पोलिसांनी ती पिशवी उघडून पाहिले असता त्यात छोटय़ा पुडय़ांमध्ये बांधून ठेवलेला जवळपास 690 ग्रॅम गांजाचा साठा मिळून आला. मानखुर्द येथून त्याने हा गांजा आणल्याचे समजते. मात्र त्याने कोणाकडून हा गांजा घेतला आणि तो कोणाला विकणार होता याचा शिवडी पोलीस तपास करीत आहेत.
तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत
प्रसाद देण्यासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग करणाया सुरक्षारक्षकाला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली. सुभाष लालवर्मा असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पीडित तरुणी ही विलेपार्ले येथील एका सोसायटी मध्ये राहते. त्याच सोसायटी मध्ये सुभाष हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. दोन दिवसापूर्वी तरुणी ही इमारती खाली आली. सुभाषला प्रसाद देऊन ती घरी जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने गेली. त्याच दरम्यान सुभाष हा तरुणीच्या पाठोपाठ लिफ्टच्या जवळ आला. त्याने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने तिची कशी बशी सुटका केली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत ती घरी आली. घडल्या प्रकाराची माहिती तिने तिच्या कुटुंबियांना दिली. दरम्यान, तक्रारीनंतर सुभाषने पोलिसांना गुह्याची कबुली दिली.
अपहरण झालेल्या मुलीची चार तासात सुटका
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पवई येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अवघ्या चार तासात शोधून काढले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस कांदिवली येथे पोहचले. पोलिसांनी त्या मुलीचे समुपदेशन करून तिला तिच्या पालकाच्या स्वाधीन केले.
पवई येथे राहणारी ती मुलगी 31 डिसेंबरला अचानक घरातून निघून गेली. तक्रारीनंतर पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ती मुलगी एका रिक्षातून जात असल्याचे एका फुटेज मध्ये दिसले. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. पोलिसांनी त्या रिक्षाला चालकाला शोधले. त्या मुलीला कांदिवली येथे सोडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला कांदिवलीतून ताब्यात घेतले.