गुंतवणुकीच्या नावाखाली कोटय़वधींची फसवणूक; बनवाबनवी करणारे बंटी-बबली सुरतच्या हॉटेलात सापडले

डीआयएफएम नावाच्या अॅपमध्ये एकदा पैसे गुंतवा आणि महिनाअखेरीस चांगला परतावा मिळवा, अशी बतावणी करीत शेकडो नागरिकांना तब्बल 85 कोटी 17 लाख रुपयांचा गंडा घालून पसार झालेले बंटी-बबली अखेर पोलिसांच्या हाती लागले. सुरतमध्ये लपलेल्या एका हॉटेलातून झोलर पती-पत्नीला पोलिसांनी उचलले.

अशेष शैलेश मेहता (41) आणि शिवांगी अशेष मेहता (34) अशी त्या बंटी-बबलीची नावे आहेत. शेअर मार्केटमध्ये  ट्रेडिंगचे काम करणाऱया अशेषने ब्लिज कन्स्लटन्ट नावाने फर्म सुरू केली होती. 2019 साली त्याने मोबाईलवर डीआयएफएम नावाने एक अॅप तयार केले होते. त्या अॅपच्या माध्यमातून तो ऑनलाईन गुंतवणूक करण्यास लोकांना सांगायचा. पैसे गुंतवा आणि महिनाअखेरीस मिळणाऱया फायद्यातून 70 टक्के गुंतवणूकदारांना, तर 30 टक्के स्वतःला घेण्याचा करार अशेष गुंतवणूकदारांशी करायचा. सुरुवातीला त्याने बऱयापैकी परतावा लोकांना दिला. सर्वकाही सुरळीत सुरू असताना जून 2023 मध्ये अशेष आणि त्याची पत्नी शिवांगी हे अचानक मोबाईल अॅप बंद करून गायब झाले. त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. त्यामुळे अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेच्या एमपीआयडी पथकाकडे देण्यात आले. पोलीस निरीक्षक महेंद्र सावर्डेकर, नितीन पाटील तसेच चंद्रकांत वलेकर या पथकाने तांत्रिक विश्लेषण व आपल्या कौशल्याच्या जोरावर शिताफीने माग काढला असता लोकांची फसणूक करून अशेष आणि शुभांगी हे सुरतमधील एका हॉटेलात लपून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ते हॉटेल गाठून दोघांना बेडय़ा ठोकल्या.