पेंग्विनमुळे 15 पटीने उत्पन्न वाढले, राणीच्या बागेला 20 महिन्यांत 19.56 कोटींचे उत्पन्न

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात 2017 मध्ये पेंग्विन आणल्यानंतर गेल्या सहा वर्षांच्या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल 15 पटींनी वाढले आहे. 2017 मध्ये वर्षाला सुमारे 14 लाख पर्यटक आल्यामुळे 74 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र 1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत 28 लाख 59 हजार 016 पर्यटक आले असून 11 कोटी 15 लाख 3 हजार 776 रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर 1 एप्रिल 2022 पासून डिसेंबर 2023 पर्यंत 21 लाख 65 हजार 906 पर्यटक आले असून 8 कोटी 41 लाख 36 हजार 192 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच गेल्या 20 महिन्यांत 19 कोटी 56 लाख 39 हजार 968 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय हे मुंबईकरांचेच नव्हे तर देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी नवे प्राणी-पक्षी आणले गेल्याने पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात मार्च 2017 मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पंधरा ते सोळा हजार असणारी पर्यटकांची संख्या आता तीस हजारांवर जात आहे. त्यामुळे याआधी दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता तीस लाखांपर्यंत गेले आहे.

असे वाढले उत्पन्न
1 एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत या कालावधीत 13 लाख 80 हजार 271 पर्यटक आले. त्यामुळे 73 लाख 65 हजार 464 रुपयांचे उत्पन्न मिळाले.
1 एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 28 लाख 59 लाख 16 पर्यटक आले. यामुळे उद्यानाला 11 कोटी 15 लाख 3 हजार 776 रुपयांचे उत्पन्न मिळाले.
1 एप्रिल 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत 21 लाख 65 हजार 906 पर्यटक आले असून या कालावधीत उद्यानाला 8 कोटी 41 लाख 36 हजार 192 रुपये उत्पन्न मिळाले.

असे आहेत तिकिटाचे दर
या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती रुपये 50 रुपये इतके शुल्क असून 3 ते 15 या वयोगटातील मुलांसाठी रुपये 25 रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. तर आई – वडील आणि 15 वर्षे वयापर्यंतची 2 मुले अशा 4 व्यक्तींच्या कुटुंबासाठी रुपये 100 रुपये इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.