सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील सर्व दवाखान्यात 15 ऑगस्टपासून सर्व उपचार, चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत. मात्र, खेकडाफेम सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्हय़ातच रुग्णांना उपचारासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धाराशिव जिल्हा रुग्णालय कराराअंतर्गत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय संचालकांकडून स्पष्ट सूचना येत नाहीत तोपर्यंत रुग्णांना पैसे मोजूनच उपचार घ्यावे लागणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱया धाराशीव जिह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळत आहेत. बऱयाच वेळा रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. धाराशीव जिह्याचा विचार केला असता जिल्हा रुग्णालय म्हणजे आताचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे जिह्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी सिटी स्पॅन तसेच इतर आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. धाराशीव येथील जिल्हा रुग्णालय हे मागील दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण या विभागामध्ये झालेल्या कराराअंतर्गत सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचा मोफत उपचाराचा निर्णय लागू झालेला नाही.
सध्या धाराशीव येथील जिल्हा रुग्णालय म्हणजेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना केसपेपर काढण्यासाठी 10 रुपये आकारले जात असून महाविद्यालयामार्फत देण्यात येणाऱया प्रत्येक सेवेसाठी ठरावीक शुल्क आकारले जात आहे.
सर्व दवाखान्यांत उपचार मोफत करण्यात आल्यामुळे रुग्ण या ठिकाणी मोफत उपचाराच्या अपेक्षेने येतात. मात्र, या ठिकाणी केसपेपर काढण्याच्या खिडकीसह इतर ठिकाणी वैद्यकीय शिक्षक संचालनालयाकडून शुल्कमाफीबाबत अजून सूचना पिंवा पत्र प्राप्त झाले नसल्याने रुग्णांना शुल्क आकारणी सुरू राहील असे फलक लावण्यात आले आहेत.
ज्या दिवशी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेगळे केले जाईल त्याच दिवशी ही फी आकारणी बंद केली जाईल. मात्र राज्याच्या आरोग्य विभागाने यामध्ये काही सर्वसमावेशक धोरणाचा अवलंब करून मार्ग काढला तर सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळू शकतो. सध्या तरी सगळी यंत्रणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हातात असल्याने रुग्णांना उपचारासाठी फी भरावीच लागणार आहे.
डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा शल्यचिकीत्सक, धाराशीव
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रात कुठेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोफत सुविधा दिल्या जात नाहीत. या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एकत्रित असल्याने आमचा नाइलाज आहे. तरीदेखील आम्ही या ठिकाणी मेडिकल कॉलेजची फी रुग्णांना आकारत नाही. मात्र मोफत सुविधा देणे अशक्य आहे.
डॉ. शिल्पा डोमकुंडवार, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णांना आकारण्यात येणारे शुल्क (रु.) केसपेपर 10
अतिदक्षता विभाग प्रतिदिन 200 ते 500
रक्त लघवी चाचणी 35 ते 100
थायरॉईड चाचणी 60 ते 250
एचआयव्ही चाचणी 50 ते 250
एक्स रे 50 ते 200
सोनोग्राफी 100 ते 500
सीटी स्कॅन 300 ते 400