राधानगरीकरांनी फस्त केले 40 टन मटण; 80 टन चिकन

थर्टी फर्स्टला राधानगरीकरांनी तब्बल 40 टन मटण, अन् 80 टन चिकन फस्त करून नववर्षाचा आनंद साजरा केला. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुट्टी आणि रविवार आल्याने विविध प्रकारच्या मांसाहारी जेवणावर खवय्यांनी ताव मारला.

मटण व चिकनला मागणी वाढली असली, तरी त्यांचे दर स्थिर होते. मात्र, मासळीच्या भावात प्रतिकिलो 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली. तालुक्यात सर्वच गावांत चिकन-मटणाच्या दुकानांमध्ये गर्दी झाली होती. काही भागांत चिकन, मटणाच्या दुकानांजवळ ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 31 डिसेंबरला नॉनव्हेजला अधिक मागणी होती. बाजारात चिकनला 150, जिवंत कोंबडी 120, मटणाला किरकोळ बाजारात 500 ते 550 रुपये दर होता.

रेस्टॉरंट, बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु

नववर्षाचे स्वागत धूमधडाक्यात झाले. रेस्टॉरंट व बारला पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी होती. यानिमित्त हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटवर ग्राहकांची मोठी गर्दी होती. मद्यप्रेमींना बाटलीतील प्रत्येक घोटाचा आनंद घेता आला. देशी-विदेशी मद्यविक्रीतून कोटय़वधींची उलाढाल झाली.

हॉटेल, खाणावळी फुल्ल

नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण सहकुटुंब घराबाहेर पडले होते. त्यामुळे मांसाहारी जेवणाची हॉटेल आणि खाणावळीत गर्दी झाली होती. अनेक कार्यालयांतील सहकारी, संस्था, विविध मंडळे, सोसायटय़ांनी एकत्र येऊन मांसाहारीसह शाकाहारी जेवणाचा बेत आखल्याचे ठिकठिकाणी पाहावयास मिळत होते.

उत्पादन शुल्क, पोलीस, वन विभागाचा वॉच

31 डिसेंबरला मोठय़ा प्रमाणावर मद्यविक्री होते. वाहनांमधून अवैधरीत्या दारूची वाहतूक होत असते. यावर उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाचा वॉच होता. अभयारण्यात प्रवेश करणे, मद्य पिणे, गाणी वाजविणे, प्लॅस्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱया पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला होता. त्यामुळे जंगल परिसरात शुकशुकाट होता.