कोल्हापुरात पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’! जिह्यात 73 ठिकाणी नाकाबंदी; 5 हजार वाहनांची तपासणी

थर्टी फर्स्ट डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिह्यात आज पहाटेपर्यंत पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. यामध्ये फरारी आरोपींसह दारू पिऊन वाहने चालविणाऱयांवरही कारवाई करण्यात आली.

कोल्हापूर जिह्यात रविवारी सायंकाळी पाच ते आज पहाटे पाचपर्यंत अपर पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व इतर शाखेचे अधिकारी असे एकूण 70 पोलीस अधिकारी व 335 पोलीस अंमलदारांनी 73 ठिकाणी नाकाबंदी करून एकत्रितरीत्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ची कार्यवाही केली. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी, कोम्बिंगच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांना मार्गदर्शन केले.

पोलीस रेकॉर्डवरील 82 व शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱया 20 आरोपींची तपासणी करण्यात आली. पोलीस रेकॉर्डवर बऱयाच दिवसांपासून मिळून न येणारे तसेच पाहिजे असलेल्या फरारी आरोपींचा शोध घेऊन 6 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.

जिह्यातून हद्दपार केलेल्या आरोपींच्या तपासणीत आढळलेल्या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध दारू विक्री करणाऱया सहा ठिकाणी छापे टाकून ताब्यात घेतलेल्यांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. कोर्टातून वॉरंट निघालेल्या जामीनपात्र 28, अजामीनपात्र 31 जणांना वॉरंटची बजावणी करण्यात आली. सीआरपीसी 108 प्रमाणे 12 व सीआरपीसी 110 प्रमाणे तिघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

या ऑपरेशनच्या कालावधीत एकूण 5 हजार 207 वाहने तपासण्यात आली असून, त्यामध्ये 133 चालकांविरोधात दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तसेच विनाहेल्मेट 37 वाहनाधाराकांविरुद्ध कारवाई केली आहे. एकूण 145 हॉटेल्स, 103 लॉजेस व 37 गेस्टहाऊस तपासले आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली.