गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर कोपरगाव तालुक्यात बंदी घालावी; काँग्रेसची मागणी

कोपरगाव शहरांमध्ये पहिल्यांदाच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावरून गेल्या चार-पाच दिवसापासून काळे कोल्हे यांच्या कार्यकर्त्यातून राजकीय पडसाद उमटत असतानाच यापुढे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर कोपरगाव तालुक्यात बंदी घालावी अशी मागणी करीत थेट या प्रकरणात काँग्रेसने उडी घेतली आहे.

काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव नितीन शिंदे,यांनी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे, जिल्हा सरचिटणीस सुनील साळुंखे, किसान काँग्रेसचे विजय सुधाकर जाधव, चंद्रकांत बागुल, ॲड. शितल देशमुख, विलास जाधव, कोकाटे, व इतर अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात अनुचित प्रकार घडत असतात. तिच्या सर्वच शहरात झालेल्या कार्यक्रमांमध्ये अनेक टवाळखोर, उपद्रवी मनोवृत्तीचे तसेच मद्यपी हजेरी लावतात. त्यामुळे साहजिकच धूडगूस घालणे, गोंधळ घालणे असे प्रकार होतात. काही ना काही वाद झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र कोपरगाव शहर या बाबतीत अपवाद ठरले असले तरी या कार्यक्रमाने व कार्यक्रमाच्या ठिकाणावरून राजकीय पडसाद उमटले असून काळे कोल्हे या प्रस्थापित नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून शाब्दिक द्वंद रंगले असतानाच काँग्रेसने लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. मात्र गौतमी पाटील हिने आपल्या नृत्याच्या अश्लील हावभावातून तमाशा लावणीची परंपरा मोडीत काढली आहे. लावणी या लोककलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असून तरुण पिढीला वेगळ्याच वळणावर नेत असल्याचा आरोप काँग्रेसने निवेदनातून केला आहे.

त्यामुळे महाराष्ट्राच्या लोककलेची बदनामी थांबवावी, कोपरगाव ही संतांची भूमी असून ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला असलेल्या कोपरगाव तालुक्यात यापुढे गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी, व तिच्या कार्यक्रमांना यापुढे कुठलीही सरकारी परवानगी व संरक्षण देऊ नये, अशी मागणी काँग्रेसने अपर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. तर कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांनी बाईचा आधार घेऊन राजकारण करू नये असा चिमटा देखील त्यांनी पत्रकातून काढला.