दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे काम त्वरित सुरू करा! सचिन अहिर यांची मागणी

परळ येथील दामोदर नाटय़गृह व सहकारी मनोरंजन मंडळ कलावंतांचा प्राण असून पुनर्बांधणीचे थांबलेले काम त्वरित सुरू झाले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी येथे केले.

सोशल सर्व्हिस लीगने पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर शंभर वर्षाची परंपरा असलेले दामोदर नाटय़गृह, सहकारी मनोरंजन मंडळ, शाळा आदी सार्वजनिक उपक्रमांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावर नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते अजय चौधरी आणि आमदार सचिन अहिर यांनी प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली होती. सभागृहाबाहेर शिवसेनेचे नेते-खासदार अरविंद सावंत यांनीही कलाकारांशी संवाद साधला होता.

या पार्श्वभूमीवर नुकतीच सचिन अहिर यांनी अनेक रंगकर्मीची भेट घेतली. लवकरच ट्रस्टच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेण्यात येईल. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, कार्यकारिणी सदस्य रविराज नर आदींनी कलाकारांना भेडसावणाऱया समस्यांची माहिती दिली. निवृत्ती देसाई, शिवाजी काळे आदी कामगार नेते यावेळी उपस्थित होते.