गुजरातसाठी केंद्र सरकारची वाटमारी सुरू, संजय राऊत यांचा हल्ला

महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जात आहेत. सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प, हिरे व्यापार, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेले तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये आतापर्यंत 17 प्रकल्प घेऊन गेले. गुजरातसाठी केंद्र सरकारची दरोडेखोरी आणि वाटमारी सुरू आहे, असा हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी केंद्र सरकारच्या गुजरातप्रेमाविषयी सडकून टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ‘‘आधी गुजरातचा विकास मग देशाचा.’’ कुठल्याही पंतप्रधानांनी असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, एका राज्याचे नाही. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत. राज्यातून उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर पॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलण्याएवढी ताकद नारायण राणे यांच्यात नाही. राणे, एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये होते ना? तर त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे नाव सांगता. मग सांगा ना की राज्यातून एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही म्हणून, अशा शब्दांत संजय राऊत यांनी खडसावले.

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर संजय राऊत म्हणाले, राज्यातील हे सरकारच रेव्ह पार्टीमधून निर्माण झाले आहे. अमली पदार्थांचे रॅकेट संपूर्ण देशात सुरू आहे. त्याचे केंद्रस्थान गुजरातमध्ये आहे. सर्वाधिक अमली पदार्थ महाराष्ट्रात येत आहेत आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये चालले आहेत. महाराष्ट्राला पंजाब करण्याचे उद्योग चालले आहेत. नशेचा व्यापार सुरू आहे हे सरकारला दिसत नाही का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

भाजपने राम मंदिराचा सोहळा राजकीय केला
अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा हा आनंद क्षण असून तो देशाचा सोहळा पाहिजे. पण हा तर आता भाजपचा सोहळा झाला आहे आणि भाजपने राम मंदिर सोहळा राजकीय केला. ते अक्षता वाटत आहेत की, जणू एक लग्न सोहळा आहे. राम मंदिरासाठी शिवसेना आणि असंख्य शिवसैनिकांनी बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला कुठलेही गालबोट लावायचे नाही. हा सोहळा होऊन जाऊ द्या, आम्ही योग्य वेळी बोलू, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर सकारात्मक
वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत. हुकूमशाही बदलून टाकण्यासाठी ते ठाम आहेत. आंबेडकर यांच्या सभा बघितल्या असतील तर ते लढाईमध्ये उतरले आहेत. ते सामंजस्यपणे भूमिका बजावत आहेत. राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेशी चर्चा केली आहे. जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.