लाखो रुपये खर्चून रेल्वेचे टुकार बॅरिकेडिंग, पुरेसे सिमेंट लावता उभारले तकलादू ग्रील

प्रवासी सुरक्षेच्या नावाखाली लाखो रुपये खर्चून मध्य रेल्वे आपल्या स्थानकांमध्ये टुकार लोखंडी बॅरिकेडिंग उभारत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्रवाशांनी रेल्वे ट्रक ओलांडू नये म्हणून दोन रुळांच्या मध्ये लोखंडी ग्रील उभारण्याचे काम कुर्ला स्थानकात सुरू आहे, मात्र सदर ग्रील उभे करण्यासाठी कोणताही खड्डा न पाडता केवळ वरवर तुटपुंजे सिमेंट लावले जात आहे. त्यामुळे भविष्यात सदरचे ग्रील कोसळून रेल्वे ट्रकमध्ये पडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकलने दररोज 45 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी सर्वच स्थानकांच्या फलाटावर गर्दी असते. त्यामुळे अनेक प्रवासी बेकायदेशीरपणे रेल्वे ट्रॅक ओलांडतात. त्यामध्ये अनेकांचे बळी जातात. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे रूळ ओलांडणाऱया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी कुर्ला स्थानकात फलाट क्रमांक सहा आणि सातदरम्यान लोखंडी बॅरिकेडिंग उभारण्याचे काम सुरू आहे. सदरचे बॅरिकेड्स जमिनीत खड्डा पाडून त्यामध्ये योग्य सिमेंट टाकून उभारणे आवश्यक आहे. मात्र सध्या केवळ कठडय़ावर बॅरिकेड्स उभे करून कोणतेही खोदकाम न करता केवळ तुटपुंजे सिमेंट लावून ते उभे केले जात आहेत. त्यामुळे ते उभे राहिल्याचे दिसत असले तरी त्याला जोराचा धक्का बसल्यास ते कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. याबाबत मध्य रेल्वेकडे विचारणा केली असता सदरची ग्रील मजबूत असून कोसळण्याची शक्यता नसल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

कंत्राटदाराची की रेल्वेची थुकपट्टी
रेल्वे ट्रकमध्ये लोखंडी ग्रील उभारणीचे काम सुरू असले तरी त्याचा दर्जा पाहता एकप्रकारे थुकपट्टीच सुरू असल्याचे दिसत आहे. सदरची थुकपट्टी कंत्राटदाराकडून केली जात आहे की रेल्वेकडूनच तशी थुकपट्टी करण्यास सांगितले जात आहे, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.