हॉकी फाईव्ज वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचे दोन्ही संघ जाहीर; सिमरनजित सिंग, रजनी इतिमारपूकडे कर्णधारपद

फुटसालच्या धर्तीवर मस्कत (ओमान) येथे नववर्षात होणाऱया हॉकी फाईव्ज (पाच जणांचा संघ) वर्ल्ड कपसाठी ‘हॉकी इंडिया’ने रविवारी हिंदुस्थानच्या पुरुष व महिला संघांची घोषणा केली. पुरुष संघाचे कर्णधारपद सिमरनजित सिंगकडे, तर महिला संघाचे नेतृत्व रजनी इतिमारपू हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. महिलांची स्पर्धा 24 ते 27 जानेवारीदरम्यान, तर पुरुषांची स्पर्धा 28 ते 31 जानेवारीदरम्यान होणार आहे.

महिला संघाची कर्णधार रजनी इतिमारपू ही संघाची गोलरक्षक आहे, तर उपकर्णधार महिमा चौधरी संरक्षण फळीची आधारस्तंभ आहे. बन्सारी सोलंकी ही बदली गोलरक्षक असून अक्षता ढेकळे व ज्योति छत्री या डिफेंडरची जबाबदारी सांभाळतील. मधल्या फळीत मारियाना कुजुर व मुमताज खान यांच्यावर मदार असेल. याचबरोबर अजमिना कुजूर, ऋतुजा पिसाळ व दीपिका सोरेंग यांचा फॉरवर्ड खेळाडू म्हणून संघात समावेश झाला आहे. हिंदुस्थानी महिला संघ नामिबिया, पोलंड व अमेरिका संघांचा समावेश असलेल्या ‘क’ गटात आहेत. ‘अ’ गटात फिजी, मलेशिया, नेदरलॅण्ड, ओमान, तर ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युव्रेन व झांबिया, तर ‘ड’ गटात न्यूझीलंड, पराग्वे, थायलंड व उरुग्वे या संघांचा समावेश आहे.

पुरुष संघात अनुभवी फॉरवर्ड सिमरनजीत सिंह हा ऑलिम्पिक कास्यपदक विजेता डिफेंडर मनदीप मोर याच्या साथीत संघाचे नेतृत्व करणार आहे. गोलरक्षकाची जबाबदारी सूरज करकेरा व प्रशांत कुमार चव्हाण यांच्याकडे असेल. डिफेंडर म्हणून मंजीतच्या साथीत मंदीप मोरचाही समावेश आहे. मधल्या फळीत मोहम्मद राहील मौसीन व मनिंदर सिंह, तर आघाडीच्या फळीत कर्णधार सिमरनजीतसह पवन राजभर, गुरजोत सिंह व उत्तम सिंह यांच्यावर जबाबदारी असेल. हिंदुस्थानी पुरुष संघ इजिप्त, जमैका व स्वित्झर्लंड या संघांचा समावेश असलेल्या ‘ब’ गटात आहेत. ‘अ’ गटात नेदरलॅण्ड्स, नायजेरिया, पाकिस्तान व पोलंड, तर ‘क’ गटात ऑस्ट्रेलिया, केनिया, न्यूझीलंड, त्रिनिनाद व टोबॅगो, तर ‘ड’ गटात फिजी, मलेशिया, ओमान व अमेरिका या संघांचा समावेश आहे.