तेजस ठाकरे यांच्या संशोधनाचे ‘दशक’, 10 नवीन प्रजातींचा शोध लावला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व आमदार आदित्य ठाकरे यांचे बंधू वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांनी आणि त्यांच्या पथकाने या वर्षी संशोधनाचं दशक पूर्ण केलं आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये आणि जंगलात राहणाऱ्या 10 नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. यात साप, खेकडा, पाल, सरडा अशा सरिसृप प्रवर्गातील प्राण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याआधीही त्यांनी खेकडे, मासे, पाली अशा 11 हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावून त्यांना नवी ओळख मिळवून दिली आहे.

तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या या विशेष कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. यापूर्वी पालींवर संशोधनावर, तेजस ठाकरे यांचा शोध निबंध जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या व्हर्टब्रेज झुलॉजी या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. ऑगस्ट महिन्यात तेजस यांनी शोधलेल्या सापाच्या नवीन प्रजातीला सह्याद्रीओफिस असं नाव देण्यात आलं आहे. तेजस आणि त्यांच्या पथकाने निमास्पिस टायग्रीस, निमास्पिस सक्लेशपुरेनासिस, निमास्पिस विजयाई आणि इतर पालींच्या नवीन प्रजातींचा शोध देखील लावला आहे. अशा जातीच्या प्रजाती हिंदुस्थानासह श्रीलंका, थायलंड, सुमात्रा तसंच इतर बेटांवर आढळून येतात. आतापर्यंत पालीच्या देशातील 68 प्रजाती समोर आल्या आहेत. त्यात आता तेजस ठाकरे आणि त्यांच्या चमूच्या संशोधनाची भर पडली आहे.

तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रागांतील अंबोली घाटात माशाची चौथी नवीन प्रजाती समोर आणली होती. हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या माशाचा शोध त्यांनी लावला होता. भविष्यात अजूनही मोठ्या प्रमाणात संशोधन करून आणखी दुर्मीळ प्रजाती शोधण्याचा त्यांच्या पथकाचा मानस आहे.