रामलल्लाला आम्ही पक्के घर दिले!

रामलल्ला सोबत देशातील चार कोटी गरीब व्यक्तींना आमच्या सरकारने पक्के घर दिले, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. एक वेळ अशी होती की, भगवान श्रीराम हे तंबूत राहत होते. परंतु आता रामलल्लाला सुद्धा आम्ही पक्के घर दिले आहे, असे मोदी म्हणाले.

22 जानेवारीला अयोध्येत गर्दी करू नका
अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरातील मुख्य प्राणप्रतिष्ठेचा समारंभ होत आहे. या कार्यक्रमाला देशविदेशातील रामभक्त येणार आहेत. अयोध्येतील हॉटेलं आधीच बुक झाली आहेत. कार्यक्रमासाठी अयोध्येत मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला होत असलेल्या कार्यक्रमाला न येता 23 जानेवारीपासून अयोध्येत दर्शनासाठी, या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांना केले आहे.