हेमंत सोरेन यांना ईडीचे सातव्यांदा समन्स

ईडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रिंगप्रकरणी पीएमएलअंतर्गत सातव्यांदा समन्स बजावले आहे. सोरेन यांनी पुढील दोन दिवसांत ईडी कार्यालयात येऊन त्यांचे म्हणणे मांडावे, असे ईडीने आपल्या नोटिशीत म्हटले आहे.

ईडीने याआधी 12 डिसेंबरला सोरेन यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु हेमंत सोरेन यांनी ईडीने पाठवलेल्या प्रत्येक समन्सकडे दुर्लक्ष केले असून चौकशीला गैरहजर राहिले आहेत. ईडीने हेमंत सोरेन यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, जमीन घोटाळा प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी सोरेन यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांनी दिलेल्या वेळेनुसार ईडी स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास तयार आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने याआधी सहा वेळा समन्स पाठवले आहे. परंतु ते एकदाही चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. जमीन घोटाळाप्रकरणी आतापर्यंत आयएएस अधिकारी छवी रंजन यांच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली आहे. पेंद्रीय तपास यंत्रणा ईडीकडून एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सातत्याने समन्स पाठवण्यात येत असल्याने सरकारची प्रतिमा खराब होत आहे, असा आरोप हेमंत सोरेन यांच्याकडून करण्यात आला आहे.