कुस्ती महासंघाच्या मस्ती विरोधात आवाज! विनेश फोगाटने कर्तव्य पथावर खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार सोडले

कुस्तीतील मस्तीविरोधात कुस्तीपटूंची पुरस्कार वापसी सुरूच आहे. कुस्तीपटू विनेश पह्गाट हिने आज शनिवारी ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कार परत केले आहेत. तिने 26 नोव्हेंबरला पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. आज शनिवारी विनेशने पंतप्रधान कार्यालयाबाहेरील कर्तव्य पथवर हे दोन्ही पुरस्कार ठेवले. बजरंग पुनिया याने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

बजरंग पुनियाने ‘एक्स’वर लिहिले, हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये. देशातील महिला कुस्तीपटूंसाठी सध्या सर्वात वाईट दिवस आहेत. विनेश पह्गाट पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात जाणार होती, परंतु पोलिसांनी तिला तेथपर्यंत जाऊन दिले नाही. मध्येच अडवले. त्यामुळे विनेशने कर्तव्य पथवर हे दोन्ही पुरस्कार ठेवले व माघारी परतली. नंतर हे पुरस्कार पोलिसांनी ताब्यात घेतले. याआधी बजरंग पुनियानेही आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत केलेला आहे. हिंदुस्थान कुस्ती संघांच्या निवडणुकीत संजय सिंह यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. वीरेंद्र सिंहनेही ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे.

बृजभूषण सिंह यांना आणखी एक धक्का
भाजप खासदार आणि हिंदुस्थान कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या घरात सुरू असलेले कार्यालय बंद करण्यात आले आहे. या कार्यालयावर क्रीडा मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. या ठिकाणी सुरू असलेले कार्यालय बंद करण्यात आल्यानंतर कुस्ती महासंघाचे नवीन कार्यालय नवी दिल्लीतील हरिनगरमध्ये उघडण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाने 24 डिसेंबरला अध्यक्ष संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित पॅनलला अवघ्या तीन दिवसांत बरखास्त केले होते. त्यानंतर महासंघाचे कामकाज माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्या निवासस्थानी होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप आहे. तसेच त्यांनी महासंघाचे अध्यक्ष असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही महिला कुस्तीपटूंनी केला आहे.