थर्टी फर्स्ट धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी नागरिकांची तयारी झाली आहे. हॉटेल, पब, मॉल, रिसॉर्ट याबरोबरच चौपाटय़ांवरदेखील जल्लोष करण्याचा बेत आखण्यात आला आहे. त्यामुळे चौपाटय़ांवरही सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोक गर्दी करणार असल्याने त्याची पोलिसांनी दखल घेतली आहे. मुंबईच्या सागरी किनाऱयांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शिवाय गर्दीचा फायदा घेत कोणी समुद्रामार्गे शहरात घुसण्याचा प्रयत्न करू नये याकरिता पोलीस अॅलर्ट झाले आहे.
नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी लोपं समुद्रकिनाऱयांनादेखील पसंती देतात. अनेक कुटुंब तसेच मित्र- मैत्रिणींचा ग्रुप समुद्रकिनाऱयांवर धम्माल मस्ती करण्यासाठी आवर्जून जातात. त्यामुळे थर्टी फर्स्टची रात्र लोकांना जल्लोषात साजरी करता यावी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जमिनीवरील सुरक्षा व्यवस्थेप्रमाणे सागरी सुरक्षादेखील कडक करण्यात आली आहे. 16 बोटींच्या माध्यमातून मुंबईच्या सागरी किनाऱयांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. विशेष करून गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव, जुहू, मढ-मार्वे, अक्सा, वांद्रे अशा हमखास गर्दी होणाऱया समुद्रकिनाऱयांवर बोटीतून नजर ठेवण्यात येणार आहे.
समुद्रकिनाऱयावरील लँडिंग पॉइंटच्या दिशेने जाणाऱया मार्गांवर विशेष नाकाबंदी आहे. कोणीही आक्षेपार्ह गोष्टी घेऊन जात असेल तर अशांना रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.प्रत्येक बोटीवर एक अधिकारी व आठ कर्मचारी असे पथक असणार आहे. 16 बोटींव्यतिरिक्त दोन बोटी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोणी समुद्रमार्गे घुसखोरी करीत असेल तर त्याला वेळीच रोखण्याचे काम या बोटींच्या माध्यमातून पोलीस करणार आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री याआधी झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन समुद्रात पोहण्यासाठी उतरणाऱयांवरही वॉच असेल.
पश्चिम रेल्वेवर आठ विशेष लोकल धावणार
पश्चिम रेल्वे रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री आठ विशेष लोकल चालवणार आहे. चर्चगेट स्थानकातून मध्यरात्री 1.15 वाजता पहिली तर दुसरी लोकल रात्री 2 वाजता चर्चगेटहून सुटणार आहे. तिसरी लोकल रात्री 2.30 वाजता तर चौथी लोकल पहाटे 3.25 वाजता चर्चगेटहून विरारसाठी सुटणार आहे. विरारहून रात्री 12.15 ते 3.05 वाजतादरम्यान चार लोकल सोडल्या जाणार. पश्चिम रेल्वेवर उद्या रविवारी 17 साध्या लोकल रद्द करून त्याजागी एसी लोकल चालवल्या जाणार आहेत.
ऑपरेशन ऑल आऊट
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविले जात आहे. शुक्रवारी पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेऊन 23 आरोपींना अटक केली. महिलांविरुद्ध गुन्हे करणारे 24 व मारामारीचे गुन्हे करणाऱया 31 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी 49 कारवाया करण्यात आल्या असून चाकू, तलवारी असे शस्त्रs हस्तगत करून आरोपींना बेडय़ा ठोकण्यात आल्या. 50 तडीपार आरोपींना उचलण्यात आले. संशयास्पदरीत्या वावरणाऱयांविरोधात 123 कारवाया करण्यात आल्या. याशिवाय ड्रग्ज पेडलर्स, नियमबाह्य वाहने चालविणारे अशांवरदेखील कारवाया करण्यात आल्या.