>>धनंजय साठे
वादग्रस्त ठरलेला मुलीचा जन्म असो किंवा त्या मुलीचं एकटीने केलेलं संगोपन असो. त्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपलं उभं आयुष्य बेतणारे एक झंझावाती वादळ म्हणजेच अनेकांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, प्रतिष्ठित अभिनेत्री, निर्माती नीना गुप्ता! आपल्या समोर येणाऱया असंख्य वादळांना निडरपणे सामोरी जाणारी, एक सक्षम अभिनेत्री म्हणून अनेक उत्तम चित्रपटांतून आपला ठसा उमटवणारी नीना गुप्ता स्त्रियांसाठी एक प्रेरणा बनली.
क्यों बनू मैं किसी ओर के जैसा
जमाने में जब कोई मुझसा नही
ओळींच्या विचारावर आपलं उभं आयुष्य बेतणारे एक
या झंझावाती वादळ म्हणजेच अनेकांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, प्रतिष्ठित अभिनेत्री, निर्माती नीना गुप्ता! नावात जरी गुप्ता असलं तरी अतिशय पारदर्शक पद्धतीने आपल्या समोर येणाऱया असंख्य वादळांना निडरपणे सामोरी गेलेली नीना गुप्ता… मग तो अतिशय वादग्रस्त ठरलेला त्यांच्या मुलीचा जन्म असो किंवा त्या मुलीचं एकटीने केलेलं संगोपन असो. त्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी मात केली. समाजामध्ये इतर स्त्रियांसाठी एक प्रेरणा बनली. स्वबळावर आपल्या मुलीला मोठं केलं. ते करताना एक सक्षम अभिनेत्री म्हणून अनेक उत्तम चित्रपटांतून आपला ठसा उमटवला. अनेकांना कदाचित कल्पना नसेल, पण नीना गुप्ताने एक सक्षम निर्माती म्हणूनही आपली भूमिका चोख बजावली आहे.
1994 मध्ये निर्मिती क्षेत्रात नीनाने प्रवेश केला. मालिका होती ‘दर्द.’ तेव्हा ती दूरदर्शनवरून प्रक्षेपित झाली होती. या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्या नंतर येणाऱया वर्षांमध्ये त्यांनी अनुपम खालीधर यांच्या तौरस व्हिडीओ सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेसोबत पार्टनरशिप करून अनेक सुप्रसिद्ध व यशस्वी मालिकांची निर्मिती केली. साँस, पलछिन, गुमराह, सिसकी, सोनपरी, क्यू होता है प्यार… यांसारख्या गाजलेल्या मालिका ‘स्टार प्लस’वर जबरदस्त चालल्या होत्या.
याच दरम्यान मी नीना गुप्ता आणि तौरस व्हिडीओचं काम सांभाळायला लागलो आणि बघता बघता अख्खा डोलारा माझ्या खांद्यावर पेलायला लागलो. अर्थात याचं श्रेय मी नीना गुप्ता आणि अनुपम खालीधरांना देईन. काम होतच होतं, पण या निमित्ताने नीना गुप्ता यांची काम करण्याची क्षमता, त्यांचं ज्ञान, अफाट वाचन, नाटक-सिनेमा या विषयाचा गाढा अभ्यास मला जवळून अनुभवायला मिळाला. बास म्हणून प्रचंड शिस्ताप्रिय. ऑफिसला येणाऱया प्रत्येक पाहुण्याला नेहमी आश्चर्य वाटायचं की इतकं टापटीप ऑफिस, इतकी शांतता, स्वच्छता किती छानपैकी मेन्टेन केली आहे. त्याच दिवसांमध्ये मला हेही समजलं की, नीना यांना घरचं जेवणच आवडतं. किंबहुना त्यांना तेच लागतं. तसंच त्यानंतर दुपारची वीस मिनिटांची वामकुक्षी! इकडचं जग तिकडे झां तरी ती वामकुक्षी व्हायचीच व्हायची.
बहुतेक वेळा आमच्या मीटिंग्ज या दुपारी लंचनंतरच असायच्या. एकदा गंमतच झाली. त्यांचा एक चाहता मला रोज दुपारी कॉल करून एकदा तरी माझं नीना मॅडमशी बोलणं करून द्या ही एवढीच मागणी करायचा. त्यांना भेटणं इतकं काही सोपं काम नव्हतं. दररोज तो फोन करून तोच प्रश्न विचारायचा आणि माझं रोज ठरलेलं ‘नाही’ हेच उत्तर असायचं.
शेवटी एक दिवस त्याने एक पार्सल पाठवलं. भला मोठ्ठा बाक्स होता. मी उघडून पहिला तर त्यात एक सुंदर फुलांचा बुके होता आणि एक गुलाबी रंगाचा केक होता. त्या दोन्ही गोष्टी मी नीना मॅमच्या केबिनमध्ये घेऊन गेलो आणि नीना मॅमला सगळं सविस्तर सांगितलं. त्यांनी बराच वेळ विचार केला आणि म्हणाल्या, ‘मी कसा या केकवर आणि पाठवणाऱया व्यक्तीवर विश्वास ठेवू?’ त्यांनी मला एक तुकडा खायला सांगितला. मी तो तत्परतेने खाल्ला. दोन मिनिटं त्या माझ्याकडे बघत राहिल्या आणि मग जोरात हसत म्हणाल्या, “आप इतना काम करते हो, इतना सब संभालते हो, तो पहला हक आप का और अपने बाकी स्टाफ का होना चाहिये.” मी तोंडाचा आ वासून बघतच राहिलो. मग त्यांनी लगेच ऑफिस बॉयला बोलावलं. केकचा एक छोटा तुकडा स्वत खाल्ला आणि बाकी केक स्टाफमध्ये वाटून टाकला. त्या चाहत्याला रिटर्न गिफ्ट पाठव असं मला बजावलं. चाहत्यावर न रागावता समंजसपणे के ती कृती एक बॉसपेक्षा एक माणूस म्हणून खूप काही बोलून गेली.
एकीकडे ही प्रेमळ बाजू तर दुसरीकडे तेवढीच स्वतच्या तत्त्वांवर अढळ राहणारी एक निर्माती, अशा दोन्ही बाजू पाहायला मिळाल्या. 2003 साली विवेक मेहरा यांच्याशी त्यांनी विवाह केला. आपल्या मुलीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. आज मुलगी, मसाबा गुप्ता फॅशन डिझायनर म्हणून नावारूपाला आली आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात ‘मला काम करायचं आहे. मला काम द्या.’ असं जाहीरपणे सोशल मीडियावर सांगणारी बेधडक, पण आतून संस्कारक्षम असणारी नीना मॅम आज अनेक चित्रपट-वेब सीरिजमध्ये झळकताना दिसत आहे. जगाने तिच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं. पण तिने कधीच काही लपवलं नाही. तिचं आयुष्य हे नेहमी ‘खुली किताब’च राहिलं आहे. त्यांची त्यांच्या कामावरची निष्ठा, कुठलीही व्यावसायिक तडजोड न स्वीकारता निर्माती म्हणून दर्जेदार कलाकृती देण्याचा प्रयत्न आणि समाधानी राहणं… त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू खूप काही शिकवून गेले.
‘सच कहूं तो’ हे त्यांचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. ती सच बोलणारी आहे म्हणून त्यांच्यासारखं कोणीच नाही.
[email protected]
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)