मोनेगिरी -जटाशंकर

>>संजय मोने

मला भेटलेल्या अशा अनेक व्यक्तींपैकी एक जटाशंकर. प्रांतीय पूर्वग्रह निगुतीने जपत मी त्याच्याशी बंबय्या हिंदी आणि मराठीचे भाषा संस्कार दाखवताना त्याने मात्र माझी बोलती बंद केली. अस्खलित मराठीत बोलणाऱया कॅब ड्रायव्हर जटाशंकरचे मराठी साहित्यावरील प्रेम, नाटक-कथा-काव्य याची जाण पाहून हा प्रवास अजून लांबला असता तर बरं झालं असतं असं वाटून गेलं.

हा सांप्रती पुरुषावतार मला भेटला तो आपण ऑस्ट्रेलियाबरोबर विश्वकप हरलो त्याच्या दुसऱया दिवशी संध्याकाळी. सगळीकडे कालच्या अंतिम फेरीतल्या पराभवाचे व्रण लोकांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होते. काही करावं असा उत्साह नव्हता, पण एका महत्त्वाच्या कामासाठी मला जावं लागणार होतं. शक्यतो लवकरात लवकर बोलणं आटपून घरी येऊन शांत पडून आदल्या दिवसाच्या जखमा कुरवाळत बसावं असं ठरवलं होतं. खरंच संपूर्ण स्पर्धेत आपण फार सुंदर खेळ केला होता, त्या मानाने आपण अंतिम फेरीत शस्त्रं म्यान केली तर!

बाहेर जाणार होतो, मालाड-कांदिवलीला एकाला भेटायचं होतं म्हणून हल्ली जे aज्ज् वापरून वाहन बोलावता येतं त्या माध्यमातून (हा ‘माध्यमातून’ नावाचा नवा शब्द तयार झाला आहे ना, तो अतिशय भयाण आहे… म्हणजे ‘अमुक किंवा तमुक यांनी गरजू विद्यार्थ्यांना स्वस्त वह्यांचं वाटप केलं’ असं सोप्या भाषेत लिहिता किंवा सांगता येतं. त्याऐवजी ‘अमुक किंवा तमुक यांच्या माध्यमातून स्वस्त वह्यांचं वाटप केलं गेलं’ असं लिहितात. आता ‘माध्यम’ याचा मराठीत अर्थ काहीही असेल, पण ‘माध्यम’ या शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द स्ग्ल्स् असा आहे आणि त्याच्या अनेक अर्थांपैकी एक अर्थ, ‘मृतात्म्यांशी संवाद साधू शकणारी व्यक्ती’ असाही आहे. जाऊ दे ‘माध्यम’ या शब्दावर झाला इतका खल पुरेसा आहे). मी वाहन ठरवून घेतले. काही वेळानंतर तो घराच्या खाली आला. मी उतरून त्यात बसलो ओटीपी वगैरे देण्याचे सोपस्कार पार पडले.

“देखिये! दादर सिग्नल के बाद…” समोरचा माणूस कुठल्या प्रांतातला आहे याची खात्री न करता फक्त महाराष्ट्रीयन लोकच हिंदी बोलायला सुरू करतात. चालक जर इथे अनेक वर्षं वाहन चालवत असेल तर त्याला स्थानिक भाषा बोलता आली पाहिजे, निदान त्या चालकाचा संभाषण, मराठीत करण्याचा प्रयत्न तरी जाणवला पाहिजे याबाबत आपण अजिबात जागरूक नसतो, केविलवाणी हिंदी ही बंबैया हिंदी म्हणून चालवली जाते याचीही लाज कोणाला वाटत नाही. ना चालकाला ना गिऱहाईकाला. शिवाय सगळे राजकीय पक्ष आपापल्या पक्षातून वाढत्या संख्येने अमराठी लोकांना उमेदवारी देण्याच्या शर्यतीत असतात. तर…

“देखिये! दादर सिग्नल के बाद…” असं माझ्या हिंदीतून बोलल्यानंतर जटाशंकर नावाचा चालक म्हणाला, “लोकेशन टाकलंय तिथंच नेमकं जायचं आहे ना?” असं म्हणून त्याने मिश्कीलपणे समोरच्या काचेतून माझ्याकडे पाहिलं.

“तुम्हाला कसं माहीत पडलं मी मराठी आहे?” मी आश्चर्याच्या धक्क्यातून पुरेपूर बाहेर आलो नव्हतो आणि तुम्हाला कसं कळलं असं म्हणायच्या ऐवजी माहीत पडलं असं मुंबईच्या मराठीत म्हणालो. (सध्या बंबैया हिंदीसारखी एक मुंबई मराठीही प्रचलित झाली आहे.ज्यात ‘मिळाली’ किंवा ‘मिळालं’ याऐवजी ‘भेटलं’ असा शब्दप्रचार रूढ झाला आहे. अचेतन गोष्टी मिळतात, उदा. काडेपेटी मिळते आणि मित्र भेटतो, पण या सध्याच्या भाषेत काडेपेटी, तिकिटं आणि इतर अचेतन गोष्टीसुद्धा ‘भेटतात’).

“साहेब! माहीत पडलं नाही, जाणवलं. फार छान शब्द आहे. तुमच्या…म्हणजे आपल्या मराठीत.” तो म्हणाला.

“तुम्ही मराठी आहात?” त्याचा एकंदरीत उत्तर हिंदुस्थानी वेष, विशेषत डोक्यावर लोंबणारी शेंडी आणि कपाळावर लावलेला टिळा आणि खांद्याला लटकणारा गमछा बघून विचारलं.

“मराठी नाही, महाराष्ट्रीयन आहे. जन्म उत्तर प्रदेशात झाला, पण दोन वर्षांचा असल्यापासून इथेच आहे. वाहन चालवायला सुरुवात इथूनच केली, पण मग सात वर्षं कर्नाटकात ड्रायव्हर होतो.”

“मग काय झालं? कन्नड येत नाही म्हणून इथे आलात? इथे काय, सगळे समोरच्या माणसाची भाषा बोलतात, येवो अथवा न येवो”. मी जरा जास्तच भाषेचा अभिमान दाखवून त्याला नामोहरम करायला म्हणून बोललो.

“नाही साहेब! प्रयत्न करून जुजबी कन्नड बोलायलाही शिकलो, पाच-सहा महिने लागले, पण एकदा कुठलीही गोष्ट शिकायची म्हटली की, इच्छा लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोवृत्ती लागते.” मला वाटायला लागलं की, आता हाच मला नामोहरम करतोय की काय? विषय बदलायला म्हणून मी त्याला त्याचं नाव विचारलं,

“साहेब, तुम्ही शिकलेले दिसता (तो आहात म्हणाला नाही, दिसता असं म्हणाला. साला! माझी मापं काढतोय की काय?). ही शेंडी बघा, कपाळावर लावलेला टिळा बघा, शैव पंथीय म्हणजे माझं नाव जटाशंकर.”

पराभव मान्य करायचा नाही म्हणून मी म्हणालो, “हो! हो! मला अंदाज आलाच होता.”

“तुम्ही मराठी लोक वृत्तीने फार सरळ असता. बाकी ‘मराठी मराठी’ म्हणून राजकीय पक्ष बोंबा मारत असले तरी समोरच्या माणसाशी जमेल त्या मोडक्या तोडक्या भाषेत हिंदी बोलायचा प्रयत्न करता. तिकडे दक्षिण हिंदुस्थानात हिंदी येत असली तरी लोक मुद्दामहून त्यांच्या भाषेतच बोलतात. अहो साहेब! मराठीत काय नाही. सर्व प्रकारचं साहित्य सातत्याने लिहिलं गेलं ते मराठीतच ना…आणि बोलीभाषा तर इतक्या आहेत आणि त्या बोलीतसुद्धा विपुल साहित्य आहे. साहेब! ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव…कमाल आहे! नामदेव तर पार पंजाबमध्ये गेले आणि त्यांच्या गुरुबाणीत रचना केल्या!”

या जटाशंकरला इतकी बारकाईने ज्ञान कुठून मिळालं असेल? का नुसता हा छाप पाडायला बोलतोय? ही शंका मला आल्याशिवाय कशी राहील?

“जटाशंकर साहेब! तुम्ही वाचता मराठी?”
“हे बघा! आपल्याकडे कायम पुस्तक असतं जवळ.” असं म्हणून त्याने कॅबमधल्या खणात हात घालून दोन-तीन पुस्तकं दाखवली आणि पुढे…

“आता बघा! आपले देशपांडे साहेब… पु.ल. देशपांडे! त्यांचा ‘खाद्यजीवन’ नावाचा लेख मी किती वेळा वाचलाय देव जाणे! का सांगा?”
“का?”

“आपल्या व्यवसायामुळे खाण्याच्या वेळा निश्चित नसतात. कधी कधी खूप भूक लागते. जीव कासावीस होतो. मग हा लेख वाचून काढतो. मन भरून जातं. भूक थोडी दूर पळते.”

मी थक्क होऊन त्याचं बोलणं ऐकत होतो. पुढे तो कथा, काव्य यांच्यावर बोलू लागला. त्याने नाटकंही वाचली होती. बोलता बोलता म्हणाला,
“माझ्या सगळ्या मुलांना मी मराठी बोलायला शिकवलंय.”

“काय करतात तुमची मुलं?”
“साहेब! आपल्या आशीर्वादानं एक मुलगा वकील आहे आणि मुलगी डॉक्टर आहे. आत्ता ती परदेशात पुढच्या शिक्षणासाठी गेली आहे, पण जाताना मी तिला शपथ घातली आहे…परत इथेच यायचं.”

जटाशंकर मला सोडेपर्यंत बोलत होता. मी त्याची विचारसरणी बघून विरघळत होतो. उतरलो तेव्हा कालच्या सामन्यातल्या आपल्या पराभवाची खंत पळून गेली होती. वाटलं कामासाठी अजून लांब भेटायचं ठरवलं असतं तर बरं झालं असतं.
[email protected]