सांगली जिल्ह्यात 901 शेतकऱ्यांनी जादा क्षेत्र दाखवून अथवा फळपीक नसताना कागदोपत्री विमा उतरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विमा कंपनीकडून तक्रार आल्यानंतर कृषी विभागाने पीकविमा उतरविलेल्या क्षेत्राच्या प्रत्यक्षात केलेल्या तपासणीत ही बनवाबनवी उघड झाली आहे. या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे.
पुनर्रचित हवामान आधारित ‘फळपीक विमा योजना’ मृग बहार 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी या 9 फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात मृग बहरांतर्गत विमा योजनेत 2 हजार 747 शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन 1 हजार 646.36 हेक्टर क्षेत्रावर फळपीक विमा उतरविला होता. यामध्ये 901 शेतकऱ्यांच्या 592.2 हेक्टर क्षेत्रावरील तफावत आढळली आहे.
प्रत्यक्ष तपासणीत बनवाबनवी झाली उघड
यामध्ये 303 शेतकऱ्यांनी 336.58 हेक्टर क्षेत्रात फळपीक नसताना लागण असल्याचा बोगस फळपीक विमा उतरला होता. तसेच 523 शेतकऱ्यांनी फळपीक असणाऱ्या क्षेत्रापेक्षा जादा दाखविले आहे. यामध्ये 174.11 हेक्टर क्षेत्र जास्त दाखविल्याची चौकशीमध्ये माहिती उघडकीस आली आहे. तसेच 75 शेतकऱ्यांचे वय बसत नसताना 51.51 हेक्टर क्षेत्रातील फळपीक विमा उतरला होता. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांनी फळपीक विमाच उतरला नव्हता. या बोगस शेतकऱ्यांना शासनाने विमा कंपनीकडे भरलेली विम्याची रक्कम परत मिळणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून हालचाली सुरू आहेत. तसेच फळपीक विम्यामध्ये बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रलोभनाला बळी पडू नका
‘जादा विमा मिळवून देतो, असे सांगून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्यास भाग पाडले जात आहे. मात्र, यात शासनाची फसवणूक होत असल्यामुळे फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडू नये. योग्य व कायदेशीर माहिती देत विमा योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.