खालापूरच्या नाकाबंदीत सापडले 8 कोटींच्या चांदीचे घबाड; कुरिअर बॉक्समधून तस्करी

खालापूरच्या टोलनाक्याजवळ नाकाबंदीत तब्बल आठ कोटींच्या चांदीचे घबाड सापडले आहे. कुरिअरच्या 171 बॉक्समधून हा सर्व साठा घेऊन जात असतानाच पोलिसांनी या तस्करांवर झडप घातली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका टेम्पोसह काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची सध्या चौकशी सुरू असून ही चांदी नेमकी कोठे व कुणासाठी नेत होते हे उघड होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खालापूर टोलनाक्यावर नाकाबंदी सुरू असतानाच एक गाडी संशयास्पद असल्याचे पोलिसांना आढळून आले. ही गाडी अडवून पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यात 171 कुरिअर बॉक्स आढळून आले. मात्र हे बॉक्स उघडले असता तब्बल आठ कोटींची चांदी आढळून आली. ही गाडी मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाली होती.

पळस्पे येथे सहा लाखांची रोकड जप्त
कारमधून 6 लाखांची रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर कारवाई करत असताना गोवा-पनवेल हायवेवर एक कार संशयास्पद वाहतूक करताना दिसून आली. त्यानुसार निवडणूक तपास अधिकारी व पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीतून लाखो रुपयांची रोकड मिळाली.