महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पालिकेने मुंबईतील बेकायदा होर्डिंग, बॅनर हटवण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये 48 तासांत तब्बल 7 हजार 389 बॅनर्स, फलक हटवले आहेत. तर ही कारवाई अशीच सुरू राहणार असून आगामी काळात बेकायदा बॅनर, होर्डिंग, फलक लावलेला आढळल्यास संबंधिताविरोधात थेट एफआयआर नोंदवण्याची कारवाई केली जाणार आहे.
विधानसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कुठेही अनधिकृतपणे फलक आणि बॅनर्स लावू नयेत आणि ज्याठिकाणी जागा निश्चित आहेत अशाच ठिकाणीच विहित परवानगी प्राप्त करूनच जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रदर्शित करता येतील, असे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
तक्रार करा, 100 मिनिटांत कारवाई
आचारसंहिता उल्लंघनाबाबत Cvigil App, मतदार हेल्पलाईन क्रमांक 1950 यावर तक्रार करण्याची सुविधा पालिकेकडून मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी तक्रार केल्यास अवघ्या 100 मिनिटांत तक्रारीचे निवारण केले जाते.
अशी झाली कारवाई
आचारसंहिता लागू झाल्यानंतर 48 तासांत म्हणजेच 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भित्तिपत्रके – 942, फलक – 817, कटआऊट होर्डिंग – 596, बॅनर्स – 3703, झेंडे – 1331 आदी मिळून एकत्रितपणे 7 हजार 389 साहित्य अनुज्ञापन खात्याने निष्कासित केले आहे. अनुज्ञापन खात्याच्या टीमकडून महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये सातत्याने अशा पद्धतीचे साहित्य निष्कासन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिल्या आहेत.