जम्मू–कश्मीरात शेवटच्या टप्प्यात 65 टक्के मतदान, 8 ऑक्टोबरला निकाल

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी 5 पर्यंत 65.48 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाचनंतरही मतदान केंद्रावर रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात जम्मूसह 40 मतदारसंघात मतदान झाले. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. माजी उपमुख्यमंत्री ताराचंद्र आणि मुझफ्फर बेग यांच्यासह 415 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक झाली. पहिल्या टप्प्यात 61.38 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 57.31 टक्के आणि तिसऱया टप्प्यात 65.48 टक्के मतदान झाले.