जम्मू कश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 61 टक्के मतदान

दहशतवादी हल्ले आणि रक्तपाताच्या सावटाखाली बुधवारी जम्मू-कश्मीर निवडणुकीसाठी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सुरक्षा यंत्रणांच्या कडेकोट निगराणीखाली 61 टक्के मतदान नोंदवण्यात आले. जम्मूतील 8 जागा आणि कश्मीरमधील 16 जागांसाठी आज अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.

2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीला मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला. बिजबेहारा आणि डीएच पोरा येथील काही भागात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. याशिवाय एकही अनुचित घटना न घडता पार पडलेले हे मतदान गेल्या सात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील सर्वाधिक मतदान आहे. अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही आकडेवारी वाढू शकते, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी के पोळे यांनी सांगितले.

किश्तवारमध्ये 75.04 टक्के मतदान

काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे चर्चेत आलेल्या किश्तवार मध्ये 75.04 टक्के मतदान झाले. जम्मू विभागातील इंदरवाल येथे सर्वाधिक 80.06 टक्के मतदान झाले, त्यानंतर पडेर-नागसेनी येथे 76.80 टक्के मतदान झाले. दोडा पश्चिम येथेही 74.14 टक्के मतदान झाले. काश्मीर खोयात पहलगाम विभागात सर्वाधिक 67.86 टक्के मतदान झाले.

– पुढील टप्प्यांतील मतदान 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला होणार आहे. 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.